“एक देश एक रेशन कार्ड” योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-: "एक देश एक रेशन कार्ड" या योजनेची सुरुवात सन 2018 मध्ये Integrated Management of public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली.केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील, कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.

             माहे ऑगस्ट 2019 मध्ये क्लस्टरच्या स्वरुपात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांमध्ये एक देश एक रेशन कार्ड ची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरुपात करण्यात आली.  या दोन क्लस्टरपैकी एका क्लस्टरमध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य होते.

              माहे जानेवारी 2020 पासून एक देश एक रेशन कार्ड ची अंमलबजावणी 12 राज्यात (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, त्रिपुरा व गोवा)  करण्यात आली आहे.   

             माहे डिसेंबर 2020 पासून एकूण 32 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरु झाली आहे.या राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधारकार्ड प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो.

              या योजनेंर्गत दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत महाराष्ट्रातील 6 हजार 320 शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली आहे. तसेच इतर राज्यातील 3 हजार 521 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे.

               राज्यातील रास्तभाव दुकानातून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इत्यादी स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतराच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानात त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करून घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पास उपकरणांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.याकरिता लाभार्थ्यांना सद्य:स्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करून आधारकार्ड प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

               सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा 7.00 लक्ष शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करून धान्याची उचल केली जाते.

             माहे एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 94.56 लक्ष शिधापत्रिकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधाद्वारे अनुदानाचा लाभ घेतला आहे.

              एक देश एक रेशन कार्ड या योजनेच्या माहितीकरिता 14425 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक