पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून रू. 106.15 कोटी रक्कमेचा भरीव निधी मंजूर

 


अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी विविध आरोग्यविषयक कामांकरीता शासनाने एकूण रू. 106.15 कोटी रक्कमेचा भरीव निधी मंजूर केला आहे. 

जिल्ह्यातील स्त्री रूग्णालयासाठी रू.70 कोटी, महाड येथील ट्रॉमा केअर युनिटसाठी रू.17 कोटी, विरजोली ता. रोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रू. 9 कोटी, मौजे परसुले, ता. पोलादपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रू. 9 कोटी, मौजे जिते, ता.कर्जत येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी रू. 1 कोटी 15 लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

या प्राप्त झालेल्या निधीमुळे रायगड जिल्ह्यातील जनतेस अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वेळोवेळी नवीन आरोग्य संस्था स्थापनेस तसेच श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात आलेली आहे. या आरोग्य संस्था कार्यन्वित होण्याकरीता त्यांचे विहित कालावधीत बांधकाम पूर्ण होऊन जनतेस आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीत असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने उपचारात आवश्यक बदल व अत्याधुनिक सुविधांकरीता निधीची आवश्यकता असल्याने आशियाई विकास बँकेकडून कर्ज मंजूरीच्या प्रस्तावावर दि.08 मार्च, 2021 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार बांधकाम, यंत्रसामुग्री, उपकरणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरीता राज्य शासनाकडून मागणीपेक्षा कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने, राज्यातील आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असलेले रु. 7 हजार 467 कोटी (995.4666 मिलियन यू.एस डॉलर) किंमतीपैकी आशियाई विकास बँकेकडून रु.5 हजार 177 कोटी (70%) इतके कर्ज घेण्यात येणार असून राज्य हिश्याचे रु.2 हजार 290 कोटी (30%) इतक्या रकमेचे अनुदान उपलब्ध करण्यास शासनाने  मान्यता दिली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक