कोविड रुग्णांच्या मानसिक समुपदेशनासाठी 130 पेक्षा अधिक स्वयंसेवक सज्‍ज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात लवकरच सुरु होणार कोविड हेल्पलाईन

 


अलिबाग,जि.रायगड, दि.6 (जिमाका):  कोविड-19 या आजाराविषयी समाजामध्ये असणारी भीती आणि सोशल मीडियामुळे निर्माण झालेले गैरसमज याला आळा बसावा, कोविड रुग्णांचे मानसिक समुपदेशन व्हावे, याकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील कोविड हेल्पलाईन करिता 130 पेक्षा अधिक स्वयंसेवकांचे काल (दि.5 मे रोजी ) जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीम.निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने,ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ.अनिल डोंगरे आणि जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल भुसारे, ॲड.पल्लवी तुळपुळे, श्री.प्रभाकर नाईक,श्री.सुशील साईकर यांच्यासह अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती तर जवळपास 150 पेक्षा अधिक लोक व्हिडिओ कॉनफरन्सिंद्वारे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज, लोकांमध्ये कोविडबाबत असलेली संभ्रमावस्था, रुग्णांची वाढणारी संख्या याचा विचार करता लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत या गोष्टींची चर्चा करून मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी हेल्पलाईन असणे का गरजेचे आहे, त्यामध्ये समुपदेशकाची असणारी भूमिका आणि त्याचे महत्व पटवून दिले.

जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल भुसारे यांनी समुपदेशकामध्ये आवश्यक असणारे गुण, करोना रुग्ण आणि नातेवाईक यांचे समुपदेशन कसे करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, करोना हा आजार शरीरापेक्षा मानसिक नुकसान करून शरीरातील प्रतिकारशक्तीवर कसा परिणाम करतो आणि त्याचे गंभीर परिणाम कोणते, याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच मानसिक समुपदेशन केल्यास अशा रुग्णांमध्ये सकारात्मक बदल घडून त्यांच्यामधील प्रतिकारशक्तीत वाढ होत असताना दिसून आलेले आहे. त्यामुळेच कोविड हेल्पलाईनद्वारे उपचार घेत असणाऱ्या आणि घरी होम क्वॉरंटाइन  किंवा आयसोलेशनमध्ये असणाऱ्या अशा व्यक्तींचे योग्य ते समुपदेशन करून करोना आजाराला आळा घालू शकतो, असा विश्वास डॉ.भुसारे यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.अनिल डोंगरे यांनी प्लाजमा थेरपी त्यासोबत रक्तदान, करोना लस, त्याचे लाभ आणि याबाबत असलेली नियमावली, या विषयांची प्रशिक्षणार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते श्री. सुशील साईकर यांनी केले तर उप जिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक