कृषी विभागाचे विविध पुरस्कार (भाग-2)

 

विशेष लेख क्र.30                                                              दिनांक :- 05 मे 2021


 

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते.  तसेच याच विविध पुरस्कारांच्या धर्तीवर सन-2020 पासून राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांनाही युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे.

शासनाच्या सन 2020 करिता 1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण 3) जिजामाता कृषीभूषण, 4) सेंद्रीय शेती कृषीभूषण, 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) युवा शेतकरी, 7) उद्यान पंडीत, 8) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारांकरिता शेतकरी निवड व प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केल्या आहेत.

            या तीन भागांच्या लेखमालिकेतून विविध कृषी पुरस्कारांचे स्वरुप, दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या आणि निकष याची माहिती आपल्याला देत आहोत. आज वाचू या भाग दुसरा…!

 

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार :-

पुरस्काराचे स्वरुप :-

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी विजेत्या शेतकऱ्याला रु.11 हजार रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देण्यात येणारी पुरस्कार संख्या 40 (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 01 याप्रमाणे 06 असे एकूण 40)

 पुरस्काराचे निकष :-

o   शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि तो कुटुंबियासह शेती करणारा असावा. यासाठी प्रस्तावासोबत 7/12, 8 अ जोडणे आवश्यक आहे.

o    शेतकऱ्याच्या उदरनिर्वाह/चरितार्थाचे मुख्य साधन शेती व्यवसाय आहे हे संबंधित शेतकऱ्याने स्वप्रमाणित करावे.

o    प्रस्तावित शेतकरी हा एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करणारा असावा.

o    यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्धव्यवसाय, गांडूळ खत युनिट, इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा.

o   शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 03 वर्षे इतके असावे.

o   संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करीत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसून, सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसल्याबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

o   शेतकरी/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

o   संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित), 7/12,8-अ सादर करणे आवश्यक आहे.

o   विभागीय स्तरावरून संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांनी संबंधित शेतकऱ्याची/संस्थेची प्रस्तावात उल्लेखीत केलेल्या बाबींची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.

o    जिल्हास्तरीय समितीने प्रत्यक्ष कार्यक्षेत्रास भेट देवून संबंधितानी केलेल्या कार्याची खात्री करुन प्रस्ताव निकषाप्रमाणे योग्य असल्यासच प्रपत्रामध्ये शिफारशींसह अभिप्राय द्यावेत. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विकास, विस्तार, सामूहिक कृषी पणन व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले आहेत काय? याबाबत सविस्तर अभिप्राय असणे अपेक्षित आहे.

o   वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) करिता जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त सर्व प्रस्तावातील गुणानुक्रमे पहिले दोन प्रस्तावांची शिफारस विभागस्तरीय समितीकडे करण्यात यावी. विभागातून प्रत्येक जिल्ह्यातील गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय प्रस्ताव याप्रमाणे विभागात जितके जिल्हे असतील तितक्या पहिल्या दोन प्रस्तावांची शिफारस आयुक्त स्तरीय समितीकडे करण्यात यावी.

o   वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) करिता जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त सर्व प्रस्तावातील गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावांची शिफारस विभागस्तरीय समितीकडे करण्यात यावी. तसेच विभागातून गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावांची शिफारस आयुक्त स्तरीय समितीकडे करण्यात यावी.

o    या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रपत्र इ मध्ये गुणपत्रक भरायचे आहेत.

 

 

 

कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार :

पुरस्काराचे स्वरुप :-

सेंद्रीय शेतीमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या शेतकरी/संस्थेला कृषीभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार देण्यात येतो. विजेत्या संस्था/ शेतकऱ्याला रु.50 हजार रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देण्यात येणारी पुरस्कार संख्या 08 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)

पुरस्काराचे वैयक्तिक निकष :-

v  सेंद्रिय शेतीचे पीजीएस किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणिकरण केलेले असावे.

v  सेंद्रिय शेती स्पर्धा, प्रदर्शने, चर्चासत्रे, सेंद्रिय शेती मेळाव्यातील मार्गदर्शन इ. मधील सहभाग / पारितोषिकाबाबतचा तपशिल पुराव्यासह देण्यात यावा. त्याबाबतची छायाचित्रे, प्रमाणपत्र इ. सादर करणे आवश्यक राहील.

v   सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतलेले असावे. सेंद्रिय शेती तंत्रज्ञान प्रसाराबाबत सेंद्रिय शेतीबाबतचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, त्याबाबतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्वत: सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून, कार्यशाळांमधून, प्रदर्शनामधील सहभाग, सेंद्रिय शेती प्रचार व प्रसारासाठी केलेले कार्य इत्यादीतून कार्य केलेले असावे.

v  स्वतःचा शेतमाल सेंद्रिय म्हणून विक्री केलेली असावी. तशा पद्धतीचा ब्रँड असल्यास तपशील द्यावा.

v   गांडूळ कल्चर / गांडूळ खत युनिटच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार करुन त्याचा वापर स्वत: करणारा असावा तसेच इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देणारा असावा.

v  बायोडायनामिक कंपोस्ट / नाडेप यासारख्या सुधारीत पध्दतीने सेंद्रिय खत तयार करुन स्वतःच्या शेतामध्ये वापरणारा असावा. रासायनिक पदार्थांचा वापर न करता आणि बाजारातून सेंद्रिय निविष्ठा खरेदी न करता स्वतःच्या शेतावर दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर यासारख्या सेंद्रिय निविष्ठा वापरणारा असावा.

v  पीक संरक्षणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन, जैविक किटकनाशके

v  सेंद्रिय शेती पध्दतीचा किमान पाच वर्षे अवलंब केलेला असावा. सेंद्रिय शेती / शेती उत्पादनाचे प्रमाणिकरण केले असल्यास प्राधान्य देण्यात यावे. परिसरातील शेतकऱ्यासमवेत समूह पध्दतीने सेंद्रीय शेती करून सेंद्रीय शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नेतृत्व करणारा असावा.

v   शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 03 वर्षे इतके असावे.

v  संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी क‍रीत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसून, सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसल्याबाबत स्वयंघोषीत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

v  शेतकरी/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा ते याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

v   संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित), 7/12,8-अ सादर करणे आवश्यक आहे.

v   विभागीय स्तरावरून संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांनी संबंधित शेतकऱ्याची/ संस्थेची प्रस्तावात उल्लेखीत केलेल्या बाबींची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.

संस्थेचे निकष :-

  • संस्था नोंदणीकृत असावी (स्थापना झाल्याचा रजिस्ट्रेशन नंबर व दिनांक असणे आवश्यक आहे).
  • संस्थेकडे असलेले तांत्रिक मनुष्यबळ तपशिलासह (शैक्षणिक पात्रता, अनुभव, अवगत केलेले तंत्रज्ञान, तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण इ.) माहिती असावी.
  •  संस्थेने सेंद्रिय शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये भरीव कामगिरी केलेली असावी.
  • संस्थेचे कार्यक्षेत्र दर्शविणारी माहिती असावी.
  •  संस्थेचे एकूण सभासदांची संख्या नमूद करण्यात यावी.
  •  संस्थेचे उद्देश/संस्थेची घटना/ नियमावली इ. माहिती असावी.
  •  संस्थेशी संलग्न इतर संस्थाची माहिती असावी.

या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रपत्र 3 मध्ये गुणांकन व मूल्यांकन करुन गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 3 विभागस्तरीय समितीकडे सादर करावे. विभागस्तरीय समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करुन गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 3 कृषी आयुक्तालय समितीकडे सादर करावे.

 

उद्यान पंडीत पुरस्कार :-

पुरस्काराचे स्वरुप :-

फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्याला उद्यान पंडीत पुरस्कार देण्यात येतो. विजेत्या शेतकऱ्याला रु.25 हजार रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  देण्यात येणारी पुरस्कार संख्या 08 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे).

 

 

 

पुरस्काराचे निकष :-

Ø  पुरस्कारासाठी निवडावयाचा शेतकरी हा स्वतः आधुनिक पध्दतीने फलोत्पादन पिके (फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, सुगंधी औषधी वनस्पती इ. घेणारा असावा, ही प्रमुख अट असल्याने प्रस्तावित शेतकऱ्याच्या नावे शेती असावी. यासाठी प्रस्तावासोबत चालू वर्षातील 7/12 व 8अ उताऱ्यावर प्रस्ताव तपशिलाच्या अनुषंगाने फलोत्पादन पिकांच्या नोंदी असणेही आवश्यक आहे. त्याचे फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असावे.

Ø   फलोत्पादनांतर्गत यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, बीजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पॅकहाऊस, साठवणूक, मूल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात इ. कार्यात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा.

Ø   पुरस्कारासाठी निवडावयाचा शेतकरी हा आधुनिक पध्दतीच्या फलोत्पादन शेती पध्दती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इ. बाबत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा असावा. याबरोबरच फलोत्पादनासंबंधी, विविध स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संशोधन संस्थांना भेटी इ. उपक्रमामध्ये सहभागी होणारा आणि फलोत्पादन तंत्र प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकऱ्यांना अशा उपक्रमांत सहभागासाठी उदयुक्त करणारा असावा. फळपीक स्पर्धा, प्रदर्शने इ. मधील सहभाग / पारितोषिक इ. चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.

Ø  शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 03 वर्षे इतके असावे.

Ø  संबंधिताकडून ते केंद्र / राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करीत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी नसून, सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसल्याबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

Ø   शेतकरी संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा ते याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

Ø   संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित), 7/12, 8-अ सादर करणे आवश्यक आहे.

Ø  विभागीय स्तरावरून संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांनी संबंधित शेतकऱ्यांची प्रस्तावात उल्लेखीत केलेल्या बाबींची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.

Ø   या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रपत्र 5 मध्ये गुणांकन व मूल्यांकन करुन गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 5 विभाग स्तरीय समितीकडे सादर करावे. विभागस्तरीय समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करुन गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 5 कृषी आयुक्तालय समितीकडे सादर करावे.

 

युवा शेतकरी पुरस्कार :-

पुरस्काराचे स्वरुप:-

युवा शेतकरी पुरस्कारासाठी विजेत्या शेतकऱ्याला रु.30 हजार रकमेचा धनादेश,स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  देण्यात येणारी पुरस्कार संख्या 08 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे).

पुरस्काराचे निकष

  • प्रस्ताव सादर करतेवेळी शेतकऱ्याचे वय 18 ते 40वर्षे असावे.
  •  शेतकऱ्याच्या स्वतः च्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे शेती असावी आणि तो स्वत: कुटुंबियासह शेती करणारा असावा. (आई-वडील, पती/पत्नी यांच्यापैकी एका कुटुंबियाच्या नावावर शेती असावी.)
  •  शेतकऱ्याच्या उदारनिर्वाह स्वप्रमाणित करावे. चरितार्थाचे मुख्य साधन शेती प्रस्तावित युवा शेतकरी हा एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करणारा असावा.
  •  यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्धव्यवसाय, गांडूळ खत, सेंद्रीय शेती इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा.
  •  प्रक्रिया, विक्री व गट संघटन कार्य यामध्ये सक्रिय सहभाग असावा.
  •  प्रसार/समाजमाध्यमांचा कृषी विषयक माहिती प्रचार व प्रसिध्दीसाठी उपयोग करणारा असावा.
  • शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 03 वर्षे इतके असावे.
  • संबंधिताकडून ते केंद्र / राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करीत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसून, सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसल्याबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
  •  शेतकरी/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा ते याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
  • संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित) 7/12, 8-अ सादर करणे आवश्यक आहे.
  •  विभागीय स्तरावरुन संबंधित विभागीय कृषी संचालक यांचे अध्यक्षतेखाली समितीने प्रस्तावाची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.
  • जिल्हास्तरीय समितीने प्रत्यक्ष कार्यक्षेत्रास भेट देवून संबंधितानी केलेल्या कार्याची खात्री करुन प्रस्ताव निकषाप्रमाणे योग्य असल्यासच प्रपत्रामध्ये शिफारशींसह अभिप्राय द्यावेत. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विकास, विस्तार, सामूहिक कृषी पणन व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले आहेत काय? याबाबत सविस्तर अभिप्राय असणे अपेक्षीत आहे.
  • या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रपत्र 6 मध्ये गुणांकन व मूल्यांकन करुन गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 6 विभाग स्तरीय समितीकडे सादर करावे. विभागस्तरीय समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करुन गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 6 कृषी आयुक्तालय समितीकडे सादर करण्यात यावे.

या योजनांच्या व पुरस्कार प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशीदेखील आपण संपर्क साधू शकता, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

(क्रमश:)

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

 

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड