रायगड जिल्हा परिषदेचे वृक्ष लागवडीस प्राधान्य वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी मोठा सहभाग नोंदविण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- मागील वर्षी "निसर्ग" व यावर्षी "तौक्ते" चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विशेषत: समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांचे मोठे नुकसान झाले असून झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.  

 जैवविविधतेचे अस्तित्व ठेवून निसर्गासोबतची जीवनशैली निश्चित करण्यासाठी शासन आग्रही आहे. जागतिक तापमान वाढीचे संकट व हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जंगलांची वाढ ही काळाची गरज आहे.

  या बाबींना प्राधान्य देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविण्याचा संकल्प रायगड जिल्हा परिषदेने केला आहे.

 रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, उपाध्यक्ष श्री.सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ सुरेश राजाराम पाटील  व सर्व गटविकास अधिकारी यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.  यासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेमार्फत पत्राद्वारे आवाहनही करण्यात आले आहे.

   ही वृक्षलागवड ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, पडीक जमीन, शेताचे बांध, महामार्गाच्या दूतर्फा, पशुवैद्यकीय दवाखाने आदींच्या परिसरामध्ये लावावीत, अशा सूचना देण्यात आल्या असून वृक्ष लागवडीची पूर्वतयारी म्हणजे जागा निवड, रोपांची उपलब्धता, आणि खड्डे खोदणे, ही कार्यवाही दि.31 मे 2021 पर्यंत करण्याच्या व ऑगस्ट 2021 अखेर वृक्ष लागवड पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 या मोहिमेत भारतीय प्रजातीची झाडे म्हणजे वड, पिंपळ, आंबा, नारळ, सुपारी, काजू, चिंच, शेवगा अशी झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामपंचायती त्यांच्या मर्जीनुसार अन्य झाडेही लावू शकतात.

  या वृक्ष लागवड मोहिमेसाठी आवश्यक रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग, राज्य कृषी विभागाच्या रोपवाटिका किंवा जवळपासच्या खासगी रोपवाटिकेतून खरेदी करता येतील. गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण असल्यास ग्रामपंचायतीने रोपांचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

             त्याचबरोबर लावलेली झाडे जतन करण्यासाठी झाडाभोवती संरक्षक जाळी बसविणे आवश्यक आहे, ग्रामपंचायतने रोपे लागवडीची नोंद रजिष्टरमध्ये करावी, ही झाडे संवर्धनासाठी नागरिकांना व संस्थांना द्यावीत, मुख्य रस्त्यापासून पाच ते सहा मीटर अंतरावर ही झाडे लावावीत, भविष्यात ही झाडे कोणत्याही इमारतीवर पडून मालमतेचे नुकसान होणार नाही, असे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

            याबरोबरच या मोहिमेसाठी येणारा खर्च पंधरावा वित्त आयोग, ग्रामपंचायत निधी व सी.एस.आर. निधीमधून करण्यात यावा, वृक्षारोपण करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, महिला बचतगट, ग्रामपंचायत कर्मचारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग घेऊन श्रमदानातून व योग्य समन्वयातून अमृत वने, सार्वजनिक उद्याने, घन वन निर्मितीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेने केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक