जिल्हा प्रशासन लागले मान्सून पूर्व तयारीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

 

वृत्त क्रमांक:- 333                                                                 दिनांक:- 05 मे 2021

 


अलिबाग,जि.रायगड, दि.5 (जिमाका): रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व तयारी व करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली दि.23 व 27 एप्रिल  रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद अलिबाग,अध्यक्षा, योगिता पारधी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर सदस्य ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी भारतीय हवामान विभागाच्या पूर्वअंदाजानुसार यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमान असण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने येणाऱ्या मान्सून कालावधीमध्ये निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीस सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करुन आपत्कालीन प्रसंगास सामोरे जाण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्याने धरणांतून विसर्ग करावा, जेणेकरुन पूरपरिस्थती निर्माण होणार नाही. नदीची पाणीपातळीची माहिती दर 2 तासांनी नदी किनाऱ्यावरील नागरिक, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनास देण्यात यावी.

मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत यांनी अतिधोकादायक इमारतींची पाहणी करुन त्या इमारतींमधील नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. नालेसफाईची कामे 25 मे पूर्वी पूर्ण करावीत. महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. या पूर परिस्थितीसाठी महत्वाचे कारण असलेले सावित्री नदीमधील बेटे काढण्यात यावेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, बॉल्क स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत.

सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णावाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटरसह इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत.

पूर परिस्थितीमुळे रोगराई पसरुन साथरोगाचा धोका असतो. अशा ठिकाणी फवारणी करावी. पुरेसा औषधांचा साठा ठेवावा.

सर्व विभागप्रमुखांनी नियंत्रण कक्ष 24x7 कार्यान्वित करुन कोणत्याही आपत्कालीन प्रसंगास तत्पर व सक्षमपणे सामोरे जाण्याचे व अतिवृष्टी होत असल्यास नदीकडेच्या पूरग्रस्त भागातील व दरडग्रस्त गावांमधील नागरिकांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्याही सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी केल्या.

याचबरोबर अतिवृष्टीमध्ये नागरिकांनी धबधब्याच्या ठिकाणी, गडकिल्ले धोकादायक ठिकाणी जावू नये. दि.1 जून ते 31 जुलै, 2021 पर्यंत जिल्हयातील मासेमारी बंद राहणार असून मच्छिमारांनी या काळात खोल समुद्रात जावू नये,अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक