पनवेल कोविड रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे आयोजन जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे यांनी केले मार्गदर्शन

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता गवळी, डॉ.राजपूत, डॉ.प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह सर्व नर्सिंग स्टाफ सह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

या सत्राचे प्रमुख वक्ते जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे यांनी करोना आजार आणि मानसिक समुपदेशन यावर मार्गदर्शन करताना रुग्णांची आजारादरम्यान असणारी मानसिक स्थिती, त्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिक स्थिती, सोशल मीडियाद्वारे मिळणारी अपूर्ण माहिती याचा सविस्तर अभ्यास करून लोकांना करोना रुग्णांशी कसे बोलावे, कोणती माहिती द्यावी, अपेक्षा वास्तव कशा ठेवता आल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत, रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित आणि परिस्थितीसदृश्य माहिती पोहोचणे किती गरजेचे आहे त्यासोबतच रुग्णांसोबतचा आवश्यक असणारा संवाद, हा रुग्णाची प्रकृती सुधारण्यातला मोठा घटक असून त्यावर सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

करोना विषाणूचे संकट सुरु झाल्यापासून अखंडपणे 24 तास सेवा देणारे रुग्णालय, त्या रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर शारीरिक आणि मानसिक आलेला तणाव, याविषयी डॉ.भुसारे यांनी वास्तवता, तणावापासून दूर राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बसवराज लोहारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी मानसिक तणावाला सामोरे जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी या कोविड विषयी माहितीपर मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे आयोजन करण्याचे ठरविले आणि मार्गदर्शनातून मिळालेल्या माहितीच्या आधारे  तणावाला सामोरे जाऊन आपण कोविड-19 या आजाराला हरवू शकतो, त्यासोबतच सर्व कर्मचारी खूप चांगल्या पद्धतीने या आजाराला रोखण्याचे कार्य करीत आहेत, असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक