करोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृतीदल कार्यान्वित चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या क्रमांकावर माहिती देण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन

 

अलिबाग,जि.रायगड, दि.2 (जिमाका):  करोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (Task Force) स्थापित करण्यात आले  आहे.

      जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे कृतीदल कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहणार आहे.

 करोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने जिल्हा प्रशासनाला तात्काळ द्यावी. निराधार बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार असून निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून या बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येवून त्या बालकास बालगृहात दाखल करून घेण्यात येणार आहे. यासाठी करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अशा कोणत्याही बालकास किंवा अशा बालकाची ज्या व्यक्तीस माहिती आहे अशा व्यक्तीस चाईल्ड हेल्पलाईन क्र.1098 यावर सुध्दा संपर्क साधता येईल.

करोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या 0 ते 6 वर्ष या  वयोगटातील बालकांसाठी एक शिशुगृह व 6 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी दोन बालगृह निश्चित केली आहेत. यासंदर्भातील माहिती कोविड हॉस्पिटल व मदत केंद्रांनासुध्दा उपलब्ध करून दिल्यामुळे संबंधितांना मदत उपलब्ध करुन देणे सुलभ झाले आहे.

यासंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे  02141-295321 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अशोक पाटील यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक