कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक मयत झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कोरडे अन्नधान्य वाटप कोविड आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईनवर उपलब्ध करुन देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 



 

अलिबाग,जि.रायगड.दि.7 (जिमाका):- कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची स्थिती अत्यंत हालाखीची असून शासनाची मदत येईपर्यंत या कुटुंबांना तातडीची मदत देणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांनी मदत करण्याबाबतचे आवाहन रायगड जिल्हा टास्क फोर्सच्या (दि.02 जून ) रोजीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते.

या आवाहनास प्रतिसाद देऊन एस.ओ.एस.चिल्ड्रन्स व्हिलेज इंडिया या स्वयंसेवी संस्थेने अशा संकटात सापडलेल्या 200 कुटुंबांकरिता अन्नधान्याचे 200 किट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले. लाभार्थी बालक सानिका परशुराम थळे हिला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले व त्यानंतर मदत साहित्याच्या गाडीला जिल्हाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून ही गाडी साहित्य वाटपाकरीता जिल्ह्यात रवाना झाली.

यावेळी जिल्हा परिविक्षा अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास, श्री.अशोक पाटील, एस. ओ. एस. बालगृह सोगाव चे संचालक श्री. राकेश सिन्हा, प्रकल्प प्रमुख श्री. पठाण रियाज खान,  श्री. संजय काचरे, राजेंद्र मोहन्ती, अमित नागरे, वैभव घाडगे, समुपदेशक अजिनाथ काळे व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे डाटा एन्ट्री ऑपरेटर संदिप गवारे हे उपस्थित होते.  

रायगड जिल्हा टास्क फोर्स च्या दि. 02 जून 2021  रोजीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोविड मध्ये दोन्ही अथवा एक 'मयत झालेल्या बालकांचा शोध घेण्याचे काम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चाईल्ड लाईन, रायगड जिल्हा परिषद व पनवेल महानगरपालिका या यंत्रणांमार्फत सुरु आहे. यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व शहरी) यांच्या माध्यमातून जिल्हयातील अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांच्यामार्फत जिल्हयातील अशा प्रकारच्या बालकांची माहिती जिल्हा प्रशासनास मिळाल्यास या  बालकांना केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजनेचा तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेंर्तगत एकाच वेळी रु.20 हजार इतक्या अनुदानाचा लाभ दिला जाईल, असे सांगितले.

तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी निराधार बालकांना त्यांच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत बाल संगोपन योजनेंतर्गत दरमहा रु. 1 हजार 125 इतका लाभ मिळवून देण्याबाबत, अशा निराधार मुलांचे आर्थिक हक्क व शैक्षणिक हक्क अबाधित राहण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने संबंधित कुटुंबांना भेट देऊन योग्य ती कार्यवाही करावी, तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांनी या योजनेची माहिती जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहचवावी,  असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देवून जिल्हयातील नागरिकांनी कोविड आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर उपलब्ध करुन देऊन शासनास जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

या ऑनलाईन बैठकीस जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव संदिप स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक,जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सकपाळ, जिल्ह्यातील  बालगृहांचे अधीक्षक, चाईल्ड लाईन संस्थेचे अमोल जाधव आदि उपस्थित होते.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक