कोविड-19 योद्धा सन्मान शिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका) :-प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था ही कोकणातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून या संस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे सन 1998 पासून व राजेंद्र माने तंत्रनिकेतन सन 2010 पासून आंबव, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहे.

करोना या संसर्गजन्य विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हॉस्पिटल, पोलीस दल व नगरपालिका/ महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचारी योद्ध्याप्रमाणे लढून जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत.  यांचे कार्य हे देवदूतासारखेच आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा, म्हणून संस्थेच्या अभियांत्रिकी पदवी, एम.बी.ए व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये या कोविड योध्दयांच्या पाल्यांसाठी कोविड-19 योद्धा सन्मान शिक्षण योजना ही मोफत शिक्षण शुल्क व मोफत वसतीगृह शुल्क योजना सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केली होती. परंतु कोविड-19 या संसर्गाचा फैलाव अद्यापही ओसरला नसल्याने संस्थेने या योजनेचा लाभ सन 2021-22 साठी देखील प्रवेशित कोविड योद्ध्यांच्या पाल्यांसाठी सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.

ही योजना रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील हॉस्पिटल, पोलीस दल व नगरपालिका/ महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आहे.

या योजनेंतर्गत प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि पॉलिटेक्निकसाठी ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन व मेकॅनिकल इंजिनिअरींग या शाखांमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच प्रथम वर्ष एम.बी.ए साठीही प्रवेश दिला जाईल.  अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक यात प्रत्येकी एकूण 50 विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रवेश दिला जाईल. प्रथम वर्ष पदवी व एमबीए मध्ये प्रथम प्राधान्याने (first come first serve basis) प्रवेशित पाल्यांना ही योजना लागू होईल. थेट द्वितीय वर्ष पदवी व पदविकेसाठी शासनाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेमधून प्रवेशित विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल. ही शिक्षण योजना अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी लागू राहील. प्रवेशावेळी कार्यरत असलेल्या संबंधित विभागाचे शिफारस पत्र जोडणे आवश्यक आहे.

 तरी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याबाबतचे आवाहन प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, द्वारा राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, मु.पो.आंबव, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक