जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी जून ते सप्टेंबर 2021 या कालावधीत मान्सून अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- सध्याच्या मान्सून हंगामामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी जून 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत मान्सून अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

            रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण 3 हजार 228 इतके पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र आहेत. तसेच 2 हजार 254 इतक्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. अशा एकूण 5 हजार 482 इतक्या स्त्रोतांची व उपागांची (पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्या, स्टँड पोस्ट) पाणी नमुने यांची जैविक तपासणी करण्यात येणार आहे.  पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहावी आणि मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र दूषित होऊ नये, पर्यायाने दूषित पाण्यामुळे गावात कोणतेही साथीचे रोग उद्भवू  नयेत, याकरिता ही तपासणी केली जाते. ग्रामपंचायत मधील जलसुरक्षकांकडून टिसीएल (ब्लिचिंग पावडर) द्वारे पाणी शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरणानंतर या पाण्याच्या तपासणीसाठी सुमारे 150 ते 200 मिलीलिटरच्या प्रमाणात प्रत्येक स्त्रोतांचे  पाणी नमुने हे निर्जंतूक केलेल्या काचेची बाटली घेऊन पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाते. तसेच तपासणीअंती पाणी नमुना दूषित आलेल्या स्त्रोतांवर उपाययोजना करून पुर्नतपासणी केली जाते.

             सध्या जिल्ह्यामध्ये पाणी नमुने तपासणीसाठी एक जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा व पाच उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाणी वाहून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ शकतात. म्हणून ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण व नियोजन करून घेण्यासाठी तसेच पाण्याची टाकी (जलकुंभ) स्वच्छता करून घेण्यासाठी जिल्हा स्तरावरील जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता शाखेकडून सनियंत्रण केले जाते.

              पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य साथीचा उद्रेक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणीपुरवठा करणे, जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणीपुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल ठेवणे, गावात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो किंवा नाही याची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करणे, डास, माशांचा प्रादूर्भाव होऊ नये, म्हणून स्वच्छता विषयक उपाययोजना करणे, पाणी शुद्धीकरणासाठी 33 टक्के क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर यांचा तीन महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करणे तसेच गावात वेळोवेळी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 

               दरम्यान यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यातील ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जून 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत आणि अणुजैविक पाणी नमुने तपासणी अभियानांमध्ये पाणी नमुने ग्रामपंचायतींनी तपासून घ्यावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, जि.प. श्रीमती डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक