एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी मौजे महाड येथील जागा देण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभाग सकारात्मक -राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 


अलिबाग, जि.रायगड,दि. 16 (जिमाका): रायगड जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता, येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी असावे, अशी राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती सुनील तटकरे यांची मागणी आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक सुमारे 5 एकर दुग्धव्यवसाय विभागाची जमीन उपलब्ध करुन देण्यास दुग्धव्यवसाय विभागाने तत्वत: सहमती दर्शविली आहे. याबाबत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री. सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  कोकण विभागामध्ये विशेषत: रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य शासनाने महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्प कायमस्वरुपी स्थापित करण्याचा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनास सादर केला आहे. या लोकोपयोगी व अत्यावश्यक कार्यासाठी  दुग्धव्यवसाय विभागाची जागा देण्याबाबत तत्वत: मान्यता देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री कु.तटकरे यांनी स्पष्ट केले.

 जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे अतिवृष्टी होणे, दरड कोसळणे, चक्रीवादळ, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती प्रवणता या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकास, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, जलमार्ग, रेल्वे मार्गाचे जाळेही मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी अपघात व आपत्तीजन्य प्रसंगांना येथे तोंड द्यावे लागते. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी मिळणारा "सूवर्ण काळ"(Golden Period) अत्यंत महत्त्वाचा असतो. संपूर्ण कोकण विभागाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड येथील जागेत एनडीआरएफ टीम कायमस्वरूपी तैनात असल्यास बचावकार्यास वेग मिळून जीवितहानी टाळता येऊ शकेल.

 पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून महाड येथे कार्यान्वित होणाऱ्या एनडीआरएफ पथकामुळे रायगडसह रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी बचावकार्य जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक