छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय

 


अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची संचालक मंडळची बैठक दि.01 जून 2021 रोजी संपन्न झाली. या बैठकीत पुढील प्रमाणे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सारथी संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा मधील सी.स.नं.173/1ब मधील 4163 चौ.मी जमीन मुख्य रस्त्यालगत मिळाली आहे. तसेच संस्थेस 41 अधिकारी/कर्मचाऱ्यांचा स्टाफ महाराष्ट्र शासनाने दि. 04 मे 2021 रोजी मंजूर केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विशेष अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला.

सारथी संस्थेमार्फत एम.फील/पीएच.डीकरिता छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण 207 विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच 34 अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्री कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दर वर्षी अंदाजे 500 रिक्त जागा घोषित होतात. यासाठी सारथी, पुणे मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) साठी संयुक्त (पूर्व) व (मुख्य) परीक्षांसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांसाठी सन 2020-21 मध्ये अंदाजे 20 हजार रिक्त पदे जाहीर झाली. यासाठी सारथी, पुणे मार्फत केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्ज दाराना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Services) परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दर वर्षी आयोजित होतात. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील 250 उमेदवारांना पूर्व परिक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा (Civil Judge Jr. Division & Judicial Magistrate First Class) साठी सन 2020 मध्ये 74 रिक्त पदे जाहीर करण्यात आली. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील एकूण 400 उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

सारथी, पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी 2019-20 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्यांचे विद्यावेतन एकूण रु.24000/- अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य रु.15000/- देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार निवड करू शकतात.

सारथी, संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यात 948 जणांनी सहभाग नोंदविला.  यामध्ये दि. 26 एप्रिल 2021 पर्यंत इ-मेल द्वारे सादर करण्याची मुदत होती, तसेच हे घोष वाक्य पूर्ण मराठीत असणे व जास्तीत जास्त 7 शब्दापर्यंत असणे अनिवार्य होते. मागविण्यात आलेल्या घोषवाक्यांपैकी संचालक मंडळाने "शाहू विचारांना देवू या गती, साधू या सर्वांगीण प्रगती" या घोषवाक्याची निवड केली. हे घोषवाक्य श्री. जगदीश विष्णू दळवी यांनी पाठविले होते, त्यामुळे स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेतर्फे त्यांना रक्कम रु 10,000/- धनादेश देण्यात येणार आहे, अशी माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.

०००००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक