सुदर्शन केमिकल्सच्या लसीकरणाच्या स्तुत्य उपक्रमाचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले कौतुक आदिवासी बांधवांसाठी सुदर्शन कंपनी करीत असलेल्या मदतीबद्दल मानले विशेष आभार

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.21 (जिमाका):-  रोहा येथील सुदर्शन कंपनीने त्यांचा कामगार वर्ग व त्यांच्या कुटुंबियांसाठी  कंपनीच्या आवारात लसीकरण केंद्र कार्यान्वित केले आहे.  या लसीकरण केंद्राचे आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, श्री.विजयराव मोरे, श्री.मधुकर पाटील, व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष वीज, मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील, रोहा प्लांट हेड विवेक गर्ग, व्यवस्थापन व सामाजिक बांधीलकी विभागाच्या प्रमुख माधुरी सणस, श्री.रवी दिघे आदिंची उपस्थिती होती.

सुदर्शन कंपनीत काम करणारे कर्मचारी, कामगार,करार पध्दतीने काम करणारे मजूर, कर्मचारी,  कामगार तसेच त्यांचे कुटुंबिय या सर्वांचे करोनापासून  संरक्षण करता यावे, यासाठी हे लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला व त्या अनुषंगाने या लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज (दि.21 जून) रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. पुण्यातील साईश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

यावेळी सुदर्शन कंपनीच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, करोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. कंपनीतील सर्व कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण करण्यासाठी सुदर्शन केमिकल्सने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. रोहा व महाड येथील जवळपास बारा हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे. रायगड आणि लगतच्या भागातील  कर्मचारी व नागरिकांना लसीकरण होणार आहे. आपल्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. या मोहिमेतून अधिकाधिक लसीकरण होईल. एमआयडीसी परिसरातील अधिकाधिक नागरिकांना लसीकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही प्रोत्साहन द्यावे.

 सुदर्शन कंपनी ही सर्व क्षेत्रात अग्रगण्य कंपनी आहे. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या कंपनीचे मालक, कंपनी व्यवस्थापन विविध सामाजिक विकास कामात, मदत करण्यात नेहमीच सहभागी असतात. आतापर्यंत अनेकदा आदिवासी बांधवांना अन्नधान्य देणे, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य देणे, अशा उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीने स्थानिकांना नेहमीच सहकार्य केले आहे, असे सांगून पालकमंत्री कु. तटकरे यांनी शेवटी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे आरोग्य, त्यांची सुरक्षितता हा आमचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहावेत, या भावनेतून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुदर्शन केमिकल्सचा वतीने चार टप्प्यात जवळपास 12 हजार लोकांचे लसीकरण केले जाणार आहे.

यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कंपनी कामगारांच्या व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक