साकव पेण प्रकल्प-रायगड संस्थेचे कोविड काळात केलेले काम कौतुकास्पद

 


अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांना एकत्रित करून जिल्ह्यात कोविड-19 विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या, त्यापैकीच एक संस्था साकव पेण प्रकल्प-रायगड.  या संस्थेने संपूर्ण कोविड काळात समर्पित भावनेने अतिशय उल्लेखनीय काम केले.  ही संस्था मुख्यत्वे पेण तालुक्यातील वडखळ ते नागोठणे व खारेपाटातील शेतकरी, मच्छिमार महिलांसाठी तसेच पाबळ खोऱ्यातील दुर्गम व दुर्लक्षित अशा आदिवासी बांधवांसाठी काम करते.

करोना काळातील पहिल्या टप्प्यात जनजागृती करण्यासाठी दि.03 ते 6 मे 2021 या कालावधीत त्यांनी 25 आदिवासी वाड्या, 9 कुणबी गावे निवडली. या आदिवासी बांधवांमध्ये कोविड व कोविड लसीकरण याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या संस्थेने त्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दि. 10 ते 12 मे 2021 या कालावधीत जनजागृती बाबत दुसरी फेरी या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली.  या दौऱ्यात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुरेंद्र धुमाळ हे स्वतः सामील झाले होते. विशेष म्हणजे या कोविड जनजागृती अभियानात आदिवासी बांधवांना समजेल अशा, त्यांच्या भाषेतच जनजागृतीबाबतचे मुद्दे तयार करून हे अभियान राबविण्यात आले.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या माध्यमातून रुपराय, सोनगिरी, बरडावाडी, मोहाडी झापडी, गौळावाडी, पाबळ, पाबळवाडी, कुरणाड, देवमाळ, वेडकावाडी, उसर, उरसवाडी, चितळकोंड, कळद, जीर्णे, पाहिरमाळ, ताडमाळ2, तुरमाळ चाफेगणी, जांबोशी, रेवाळी, चीचवाडी, धायरवाडी, बोरीचामाळ, कार्ली, कार्लीवाडी, गंगावाडी  या आदिवासी वाड्यांमध्ये कोविड विषयी जनजागृती करण्यात आली.  यानंतर तिसरी फेरी देखील पूर्ण करून आता लवकरच चौथ्या फेरीचे आयोजन करण्यात येणार असून या फेरीदरम्यान करोनाची तिसरी लाट व त्यापासून लहान मुलांचा बचाव या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी दिली आहे.

 या जनजागृतीमुळे आदिवासी बांधवांनीमधील करोनाविषयीची भीती, लसीकरणाविषयीची भीती, गैरसमज बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.  या आदिवासी बांधवांनी  हळूहळू सॅनिटायझर चा वापर, मास्कचा वापर स्वीकारायला सुरुवात केली.  लस घेण्यासही हे आदिवासी बांधव आता संमती दर्शवू लागले आहेत.  

या संपूर्ण अभियानात साकव पेण प्रकल्प-रायगड या संस्थेसोबत जिल्हाधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव व त्यांचे इतर सहकारी अधिकारी-कर्मचारी, येरळा मेडिकल ट्रस्ट फाउंडेशन जी.डी.पोळ फाऊंडेशन, आदिवासी विकास मंच यासारख्या विविध संस्था तसेच माणिक गावंड, उमेश दौरे, प्रभाकर ठाकूर अशा अनेक कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी मदत केली असून या आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांसाठी लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार तालुकानिहाय वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, औषध निर्माता तसेच परिचारिका यांना लसीकरणाच्या कामात मदतीसाठी आदिवासी विकास विभागांतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील तसेच शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे, असे साकव पेण प्रकल्प-रायगड संस्थेचे सचिव श्री.अरुण शिवकर यांनी आवर्जून सांगितले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड