भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नेहरु युवा केंद्रातील युवकांकरिता “पाणी संकलन” या विषयावरील वेबिनार संपन्न

 


 

     अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने यंत्रणेकडून आओ भूजल जाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  या कार्यक्रमांतर्गत दि.30 जून 2021 रोजी सकाळी 11 ते 12.00 वाजेपर्यंत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रायगड यांच्या वतीने राष्ट्रीय  सेवा  योजना महत्त्व    युवा सहभाग आणि भूजल पुर्नभरणाच्या विविध उपाययोजनांबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने  वेबिनार आयोजित करण्यात आले होते.

      यावेळी राष्ट्रीय  सेवा योजना जिल्हा समन्वयक तुलसीदास मोकल  यांनी   तरुणांमध्ये समाज सेवेची  जाणीव निर्माण करण्याच्या  दृष्टीने व युवा वर्गाच्या प्रचंड शक्तीला योग्य वळण देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय  सेवा  योजना कार्यरत  असल्याचे नमूद केले. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी युवकांनी सक्रिय  सहभाग  घ्यावा, असे आवाहन  केले.  

वरिष्ठ भूवैज्ञानिक एच.एम.संगनोर यांनी भूजल पुनर्भरण उपाय योजना व पाऊस पाणी संकलनाच्या पध्दतीतसेच विहीर पुनर्भरणाची आवश्यकता तसेच छतावरील पाणी संकलनाच्या पध्दती, त्यांचे स्वरुप व रचना या विषयावर संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

रायगड जिल्हा हा जरी जास्त पर्जन्यमानाच्या विभागात मोडत असला तरीही येथील भौगोलिक रचनेमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी येथील गावांना दुष्काळ व पाणी टंचाई प्रश्नास सामोरे जावे लागते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे संकलन करणे व त्याद्वारे भूजल पुनर्भरण करणे आवश्यक असल्याचे सांगून श्री.एच.एम.संगनोर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश लोकसंख्या ही युवा आहे. त्यामुळे युवकांचा यामध्ये सक्रिय सहभाग असेल तर भूजलाची पातळी वाढविण्यासाठी तसेच टंचाई कमी करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. पुनर्भरण उपाय योजनांद्वारे रोजगारही उपलब्ध होऊ शकतो.

नंतर श्री.एच.एम.संगनोर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे व शंकाचे चर्चेद्वारे निरसन केले.

या वेबिनार मध्ये राष्ट्रीय सेवा  योजनेच्या 97 स्वयंसेवकानी  सहभाग घेतला होता. या वेबिनारच्या समन्वयाची भूमिका भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा तांत्रिक अधिकारी श्रीमती सुषमा चौधरी यांनी पार पाडली.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक