विशेष लेख:- *लोकनेता,लोकराजा, शोषितांचा, वंचितांचा आधारवड....राजर्षी छत्रपती शाहू महाराज.....!* *मानाचा त्रिवार मुजरा...!*


       महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासाला झळाळी देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले. त्यांनी लोकांचे स्वराज्य आणण्यासाठी केलेले धडाडीचे प्रयत्न आजही महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिले जातात.

      समाजात असणाऱ्या व परंपरागत आलेल्या वाईट चालीरिती, परंपरा यांना छेद देण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले. जनतेला समानता आणि स्वातंत्र्य मिळाले तर त्याचा उपभोग घेण्यासाठी व ते सर्व स्तरांवर राबविण्यासाठी सर्वप्रथम जनतेत पात्रता निर्माण करावयास हवी, या उद्देशाने प्रजाहितदक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याची नियोजनबद्ध बांधणी केली. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाज, स्त्रिया, कष्टकरी, अस्पृश्य, शेतकरी यांच्याविषयी बहुमोल असे कार्य केले आहे. महाराजांना शिकारीचे प्रचंड वेड होते. कृषी क्षेत्राची जाण असणारा व शेतकऱ्यांची नस ओळखलेला राजा म्हणून त्यांची ख्याती होती. रात्रीच्या वेळी शिकारीसाठी जात असताना वाटेत भेटणार्‍या शेतकऱ्यांची, धनगरांची, फासेपारधी यांची आपुलकीने   विचारपूस करून त्यांच्याकडून शेतीची इत्यंभूत माहिती मिळविण्यात त्यांचा हातखंडा होता. 

     आपण छत्रपती आहोत व राजघराण्याप्रमाणेच वागले पाहिजे, हा अहंभाव कधीही न बाळगता समोरच्या व्यक्तीप्रमाणेच साधी राहणी व साध्या सोप्या भाषेचा ते वापर करीत. राज्याविषयी रयतेला भीती वाटू नये म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक भरीव प्रयत्न केले व त्यातून समाजाला त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी निर्माण झाली.

     शेतीसाठी पाणीपुरवठा नियमित व्हावा म्हणून राधानगरी धरणाचे बांधकाम त्यांनी केले. राधानगरी धरणामुळे कोल्हापूर संस्थांनमधील 20 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले आणि हे फक्त छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले.

     रयतेविषयी सदासर्वकाळ दक्ष असणाऱ्या राजांच्या यादीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. रयतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी जानेवारी 1895 मध्ये शिराळा भागाचा दौरा केला. या दौर्‍यात सावकारांनी समाजाची चालविलेली लूट महाराजांनी तात्काळ थांबविली. सावकारी पाशात शेतकरी, कष्टकरी, अस्पृश्य होरपळून निघत होते, याची त्यांना कल्पना आली. कित्येक सावकार शेतकऱ्यांची गुरेढोरे देऊन त्यांचा लिलाव करीत असत. ही माहिती जेव्हा छत्रपती शाहू महाराजांना समजली, तेव्हा त्यांनी याविषयी आज्ञापत्र काढले. या आज्ञापत्राचा उद्देश एवढाच होता की,शेतकरी तगला पाहिजे आणि सावकारीला चाप बसला पाहिजे. त्या आज्ञापत्रात महाराजांनी "दिवाणी दाव्याने सावकाराने गुराढोरांचा लिलाव करू नये" असे फर्मानच काढले होते.

    इ.स.1896 मध्ये कोल्हापूरात पडलेल्या दुष्काळाने महाराजांचे काळीज पिळवटून टाकले. जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकू लागली. गुरे व इतर जनावरे पाण्याविना तडफडून मरू लागली. या दुष्काळाने रयतेच्या डोळ्यात पाणी आणले होते. कर्ज फेडता न आल्याने सावकारानी जनतेच्या जमिनी स्वतःच्या घशात घातल्या होत्या. त्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. सावकारांना जबरदस्त तंबी दिली. बाहेरच्या राज्यातून धान्य आणून गोरगरिबांना कमीत कमी भावात तर प्रसंगी विनामूल्य वाटप केले. विहीरींचे खोलीकरण केले. नद्यांवर बंधारे बांधले. हेच बंधारे पुढे "कोल्हापूर पद्धतीचे बंधारे" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आले आणि मार्गदर्शक ठरले, लाखो जनतेचा पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली.

      महाराष्ट्रात लोकाभिमुख सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात दि.26 जून 1874 रोजी झाला. पूर्ण भारतभर ख्याती पसरलेल्या आणि शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सामाजिक कार्याला नवीन आयाम देणारे राजे म्हणून त्यांची लोकप्रियता कळसाला पोहोचलेली दिसते. एक आदर्श राजा कसा असावा तर छत्रपती शाहू महाराजांसारखा असावा, असा जणू एक संकेतच होता.   

      बहुजन समाजाचा नेता म्हणून त्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. बहुजन समाज हा सामाजिक, आर्थिक, धार्मिक  बंधनानी पूर्णपणे ग्रासलेला होता व यावर सनातनी वर्गाची प्रचंड घट्ट पकड होती. बहुजन समाजाला धार्मिक व जातीय विळख्यातून बाहेर काढून एक सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. अस्पृश्यता निवारण करण्यामध्ये व समानता आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.    

       कोल्हापूर संस्थांनामधील कागल येथील माणगाव येथील गाव पाटील आप्पासाहेब दारगोंडा पाटील यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराज यांनी दि. 20 मार्च 1920 रोजी अस्पृश्य वर्गाची परिषद भरविली. या परिषदेचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषविले. या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून शाहू महाराज यांनी हजेरी लावली होती. या परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्याना उद्देशून केलेले भाषण प्रचंड गाजले. दलितविरोधी राजकारण करणाऱ्यांना त्यांनी परखड बोल सुनावले. अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागविल्याशिवाय देशकार्य पूर्णच होऊ शकत नाही, असे त्यांनी या परिषदेत ठणकावून सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या चळवळीचे नेतृत्व करावे आणि ते करण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सक्षम आहेत, अशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची पक्की धारणा होती.

     अस्पृश्य समाजातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची सोय करून 1908 साली त्यांच्यासाठी वसतिगृहही सुरू केले.

इ.स.1917 नंतर या वसतिगृहांची संख्या सात झाली. नंतरच्या काळात कामगार, तलाठी, कारकून, पोलीस, वाहनचालक इत्यादी जागा भरताना छत्रपती शाहू महाराजांनी त्या जागा अस्पृश्य वर्गातील लोकांना मिळाव्यात म्हणून विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडमध्ये जाऊन कायद्याचे शिक्षण घेता यावे म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला मदतीचा हात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीच विसरले नाहीत. या समाजातील तरुण तरुणींना वकिली किंवा डॉक्टरकीचे धडे गिरविता यावेत, म्हणून त्यांच्यासाठी महाराजांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पाणवठे,शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, सार्वजनिक स्थळे या ठिकाणी अस्पृश्यांना कमी लेखले जाऊ नये व इतर माणसांप्रमाणेच त्यांना समान वागविले जावे,यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी विशेष प्रयत्न केले. अस्पृश्यांबरोबर जेवण करण्यात महाराजांना कधीच कमीपणा वाटला नाही. बहुजन समाजाला ज्ञान प्राप्ती व्हावी, यासाठी शाळा काढून वसतिगृहे बांधली आणि दुभंगलेल्या समाजात शिक्षणाची गंगोत्री सुरू केली. आपल्या संस्थानामधील शेवटच्या घटकाला किमान प्राथमिक शिक्षण मिळालेच पाहिजे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून त्यांनी दि.20 जुलै 1917 रोजी हुकूम काढला आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.यामुळे शिक्षणाचे सार्वत्रीकरण होण्याचे श्रेय छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. इ.स. 1917-18 साली  27 शाळांमधून मोफत शिक्षण दिले जाऊ लागले तर 1921-22 साली प्राथमिक शाळांची संख्या 555 झाली. संस्थानात होणारा वायफळ खर्च त्यांनी शिक्षणासाठी सुरू केला. यातच महाराजांची शिक्षणाबाबतची आणि सर्वसाक्षरतेची दूरदृष्टी दिसून येते.

     समाजाच्या तळागाळातील सर्व मुलामुलींनी शिक्षण घ्यावे, उच्चविद्याविभूषित व्हावे आणि आपल्या पायावर उभे राहावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केले. दि. 28 नोव्हेंबर 1906 रोजी आदेश काढून त्यांनी कोल्हापूर मध्ये अस्पृश्य लोकांसाठी रात्रीची शाळादेखील सुरू केली. शिक्षणामध्ये क्रांती घडवून त्यांनी एका समाजसुधारकाची भूमिका चोख बजावली. जातीभेद दूर व्हावा आणि सर्व समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले.

        राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविध उपक्रमांद्वारे समाजात पुरोगामी उपाययोजनांना महत्त्व दिले जाऊ लागले. त्यांनी राबविलेले शैक्षणिक, प्रशासकीय, कायदेविषयक समाजाभिमुख उपक्रम त्यांच्या कार्याची उज्वल आठवण करून देतात. मनुष्याचे मोठेपण त्याच्या जन्माने नाही तर कर्माने सिद्ध होते, या विचारांचे छत्रपती शाहू महाराज होते. सनातन्यांच्या दांभिकतेवर त्यांनी आसूड ओढले. मनुष्याच्या स्वातंत्र्यासाठी महाराजांनी स्वतः विविध आघाड्यांवर विविध स्तुत्य उपक्रम हाती घेतले. स्थित्यंतरे घडण्यासाठी उद्रेकाची ठिणगी पडणे आवश्यक असते व पोटतिडकीने आपले स्वप्न पूर्ण करणे किती आवश्यक असते, हे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याने संपूर्ण बहुजन समाजाला दाखवून दिले. 

    नागपूर येथे भरविण्यात आलेल्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या समानतेसाठी संघर्ष अधिकच तीव्र करण्याचा निर्धार केला. अस्पृश्यांचा उद्धार करण्याच्या कामात शाहूंना अनेकांनी प्रचंड विरोध केला परंतु शाहू महाराजांनी न डगमगता आपले सामाजिक कार्य जोरात सुरूच ठेवले. देशाची प्रगती जोमाने व्हायची असेल तर देशातील जातीभेद नष्ट होणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले.

   अशा या लोकराजास, लोकनेत्यास आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा....!


*लेखन व संपादन:-*

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड


*सहकार्य-:*

श्री.सुभाष श्रीरंग कदम

सहाय्यक प्राध्यापक, 

दोशी वकील आर्टस्, जी.सी.यू.बी. सायन्स अँड कॉमर्स कॉलेज,गोरेगाव,

ता.माणगाव,जि.रायगड.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक