कर्जत येथील गिर्यारोहण प्रशिक्षक श्री.अमित गुरव यांचे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश

 



 

अलिबाग, जि.रायगड,दि.7 (जिमाका):- जागतिक एव्हरेस्ट दिनानिमित्त भारतातील गिर्यारोहणातील अग्रगण्य असणाऱ्या गिरीप्रेमी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत कर्जत येथील श्री.अमित गुरव (अधिकृत गिर्यारोहण प्रशिक्षक) यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

            गिरीप्रेमी (गिर्यारोहण) संस्था ही भारतामध्ये अत्यंत नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमार्फत गिर्यारोहणाच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. दि.29 मे हा दिवस 'जागतिक एव्हरेस्ट दिन' म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून, एव्हरेस्ट शिखराच्या संदर्भात या संस्थेच्या माध्यमातून छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत जवळ जवळ 200 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डॉ.रघुनाथ गोडबोले, द्वितीय क्रमांक श्री. विकास शुक्ला व  श्री.अमित गुरव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. श्री.अमित गुरव हे मूळचे कर्जत येथील रहिवासी आहेत, ते 'गिर्यारोहणाचे अधिकृत प्रशिक्षक' असल्याकारणाने त्यांची नेहमीच सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये व हिमालयामध्ये भटकंती होत असते, छायाचित्रण करणे हा त्यांचा छंद आहे. डोंगरदऱ्यांमध्ये (चुकीच्या) ट्रेकिंगच्या कारणाने होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी व योग्य व सुरक्षित गिर्यारोहण कसे करावे? याबद्दल ते विविध शाळांमध्ये व संस्थांमध्ये  गिर्यारोहणाचे, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण गेले कित्येक वर्ष देत आले आहेत.

या स्पर्धेमधील छायाचित्र 'एव्हरेस्ट बेस कॅम्प' जवळील 'काला पत्थर' (उंची 19,000 फूट) या शिखरावरून काढलेले आहे. या छायाचित्राबद्दल बोलताना त्यांनी असे सांगितले की, छायाचित्रात दिसणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावर सायंकाळच्या वेळेस सूर्याची सोनेरी किरणे पडल्यानंतर हे एव्हरेस्ट शिखर संपूर्ण सोनेरी रंगात न्हाऊन निघते. हे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी  गिर्यारोहकांना काला पत्थर या शिखरावर चढाई करून सायंकाळपर्यंत थांबावे लागते, सायंकाळच्या वेळेस हिमालयातील कुठल्याही शिखरावर चढाई करताना आणि शिखरावरून परत खाली उतरताना अतिशय थंडगार वारे व कमी तापमान अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावं लागते. हे छायाचित्र काढत असताना त्यांनाही अशाच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यावेळेस शिखरावरील तापमान हे 5 डिग्री अंश सेल्सिअस होते, असे त्यांनी सांगितले. अशा प्रतिकूल परिस्थितीत काढलेल्या छायाचित्राचा योग्य सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

श्री.अमित गुरव यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक