ध्यास पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचा... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा...... पेण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा पेण तालुक्यातील वडखळ नाका येथील नवीन ग्रामीण रुग्णालयासाठी मौजे खारकारावी येथील शासकीय जागा हस्तांतरित

 



 

अलिबाग, जि. रायगड, दि.22(जिमाका):- पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचे रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य सोयीसुविधांविषयक गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी धडाडीने निर्णय प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांच्या बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देणे. यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या विविध शासकीय जमिनींच्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहेत व त्याप्रमाणे जनतेला सोयीस्कर ठरेल, अशा ठिकाणाची शासकीय जागा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयासाठी देण्याचे निर्णय घेत आहेत.

पेण तालुक्यातील नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार मौजे खारकारावी, ता. पेण, जि. रायगड येथील स.नं. 93 एकूण क्षेत्र 1-60-00 हे.आर. (4 एकर) ही शासकीय जमीन महसूल मुक्त व सारामाफीने जिल्हा शल्यचिकित्सक रायगड-अलिबाग यांच्याकडे नवीन ग्रामीण रुग्णालय, वडखळ नाका याकरिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच जारी केले आहेत.

शासनाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गा लगत वडखळ नाका येथे नवीन ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर युनिट आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवासस्थान याकरिता मंजूरी दिली. यासाठी 1-60-00 हेक्टर आर जमिनीची आवश्यकता होती. यानुषंगाने पालकमंत्री कु. तटकरे यांनी स्वतः दि.31 मे 2021 रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी देखील केली होती.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, आदिवासी वाड्या-वस्त्या, औद्योगिक पट्टा, भातशेतीचे कोठार, जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण, आजूबाजूची ग्रामीण वस्ती अशा सर्व तऱ्हेने वडखळ नाका या जागेला विशेष महत्व प्राप्त आहे. सध्या या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनाही अद्ययावत आरोग्य सोयीसुविधांची नितांत गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील नागरिकांना हे मंजूरी मिळालेले नवीन ग्रामीण रुग्णालय तसेच ट्रामा केअर युनिट निश्चितच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही. तसेच पेण तालुक्याच्या विकासासाठी हे ग्रामीण रुग्णालय वरदान ठरेल.

भविष्यात या व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरणास व नागरीकरणास वाव आहे. त्यामुळे भविष्यातील या परिसराचा विकास लक्षात घेता येथे आरोग्य सोयीसुविधा उत्तम असणे, ही काळाची गरज आहे, अशी अभ्यासपूर्ण दूरदृष्टी ठेवून रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाचा ध्यास घेतलेल्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पुढील निर्णय प्रक्रिया तातडीने राबविली.

पेण तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच लोकोपयोगी सिद्ध होणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक