पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे रायगडवासियांशी साधला संवाद करोनाच्या संकटातून निश्चितपणे सुखरुप बाहेर पडू रायगडकरकरांना दिला विश्वास

 



 

अलिबाग,जि.रायगड.दि.7 (जिमाका):- करोनाच्या आणि राज्यभरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज (दि.7 जून) रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रायगडकर जनतेशी संवाद साधला.

आपण सर्वजण आत्मविश्वासाने व संयमाने या करोनाच्या संकटात गंभीर परिस्थितीचा सामना करीत आहोत. या चिंताजनक परिस्थितीतून आपण निश्चितपणे सुखरूप बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी नेटकऱ्यांना दिला.

      पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविडचा प्रादूर्भाव वाढताना दिसला. आपण या दोन्ही टप्प्यांचा सर्वतोपरी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. मात्र  आता  अधिक सावधपणे तिसऱ्या लाटेपूर्वी आवश्यक ती सर्व तयारी ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन आणि प्रशासन आरोग्य यंत्रणा अधिकाधिक बळकट करताना दिसत आहे. लसीकरणावरही जास्तीत जास्त भर दिला जात आहे.  शासनाने नुकताच एकूण पाच स्तरांमधून कोविड निर्बंध उठविण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.   रायगड जिल्हा चौथ्या स्तरात असून जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सविस्तर अधिसूचना काढली असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून, विविध प्रसार माध्यमांच्याद्वारे याची सविस्तर माहिती प्रसारित करण्यात आली आहे. 

या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर नव्या निर्बंधाची सविस्तर माहिती दिली व जनतेला आवाहन केले की, समाजातील सेवाभावी संस्थांनी पुढे येवून शासन, प्रशासनास सहकार्य करावे. कोविड संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. शासन आणि प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहेच परंतु नागरिकांनीही शासन व प्रशासनास  नियमांचे पालन करुन सहकार्य करावे.

त्या पुढे म्हणाल्या, नोकरीसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य देण्याचा  निर्णय घेण्यात आला असून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्याचा तर खाजगी रुग्णालयात शासनाने नेमून दिलेल्या दरानेच बिल आकारणी करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. मात्र एखाद्या रुग्णालयाबाबत कुणाची तक्रार असल्यास त्यांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर  लहान मुलांची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर तयार करण्यात येत आहेत. यात कळंबोली येथील 800 बेडच्या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 100 आयसीयू बेड, अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील 100 बेडच्या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 20 आयसीयू बेड, नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या 250 बेडच्या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 25 आयसीयू बेड, माणगाव येथील कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 50 आयसीयू बेड व जे.एस.डब्ल्यू येथील कोविड सेंटरमध्ये काही बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रसिध्द बालरोगतज्ञांशी चर्चा करुन त्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. लहान मुलांची काळजी घेण्यासाठी पालकांमध्ये तसेच जनतेमध्येही जनजागृती करण्यात येत आहे. त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे.

शेवटी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या संकटकालीन परिस्थितीत शासनाने लॉकडाऊन कालावधीतही दिलेल्या सवलतींचा जनतेने दुरुपयोग न करता स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन करुन  या संकटावर सर्वांनी मिळून मात करु, असा विश्वास व्यक्त केला.  

रायगडवासियांशी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधलेल्या या संवादाबाबत  अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ऑनलाईन धन्यवाद दिले, अनेकांनी पालकमंत्री या नात्याने कु. आदिती तटकरे करीत असलेल्या कामाबद्दल  खुल्या दिलाने प्रशंसा केली  तर काहींनी कोविडच्या तसेच मान्सूनपूर्व कामाच्याबाबतीत मौलिक सूचनाही दिल्या.

हे फेसबुक लाईव्ह जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्व्टिर व फेसबुक अकाऊंटलाही लिंक करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या या फेसबुकलाईव्हशी कनेक्ट होता आले व त्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या संवादाचा थेट लाभही घेता आला.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक