पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

 


अलिबाग, जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.

पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दूषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादूर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थावर माश्या बसून ते दूषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, पाणी स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा यासह इतर सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत.

काय करावे :-

 पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यात क्लोरिनचा वापर करून पिण्यास वापरावे, अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत, उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत. जिल्हा परिषदेच्या व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे, ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरीत ओ.आर.एस. पाजावे व त्वरीत डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे, प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे, नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वछ ठेवावा.

काय करू नये :-

 शुद्धीकरण न केलेल्या बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्नपदार्थ खाउ नये, उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाउ नये, ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक