जिल्ह्यातील ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच अनिल ढवळे व ग्रामपंचायत नागोठणेचे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांना मुख्यमंत्री संवाद कार्यक्रमात सहभागी होण्याची मिळाली संधी ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच अनिल ढवळे यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केले मनोगत शिवकर ग्रामपंचायतीने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-  राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी काल (दि.7 जून रोजी) राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच श्री.अनिल ढवळे आणि रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत नागोठणेचे सरपंच श्री.डॉ.मिलिंद धात्रक हे या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते.  तर पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच अनिल ढवळे यांना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासमोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. या संवादादरम्यान सरपंच श्री.अनिल ढवळे यांनी शिवकर ग्रामपंचायतीने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांना दिली.

  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्रीमती शीतल पुंड हे उपस्थित होते.

सरपंच श्री.अनिल ढवळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दि.22 मार्च 2020 रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर गावाने एकत्रित निर्णय घेवून गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना स्वत:हून राबविल्या.  आजतागायत संपूर्ण गावामध्ये फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात येते. गावातील लोकांमध्ये करोनाची जनजागृती करण्यासाठी ग्रामस्तरावर कमेटी स्थापन करण्यात आली. गावात राहणाऱ्या लोकांचा सर्व्हे करुन अन्नधान्य किती पुरेल याचा सर्व्हे करण्यात आला. गावातील गरीब लोकांना एक वेळचा अन्नछत्र उभारुन एक वेळचा जेवण देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीवर भार न टाकता लोकसहभागातून करण्यात आली. ग्रामपंचायतीने डिजिटल स्क्रीनद्वारे करोनाच्या बाबतीत कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती देण्यात आली. रोज सकाळी ग्रामपंचायतमार्फत करोनावर मात करण्यासाठी जनजागृती करण्यात येते. गावातील तज्ञ डॉक्टरांमार्फत माईक सिस्टिमव्दारे गावातील लोकांना माहिती दिली जाते. गावातील विदयार्थ्यांना शिक्षणाचा विसर होऊ नये म्हणून विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले.  गावातील शेतकऱ्यांना करोनाच्या कालखंडामध्ये ऑक्सिजनचे महत्व पटवून वृक्ष लावण्यास भाग पाडले. करोना संक्रमण टाळण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर संपूर्ण गावकऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करुन ग्रामपंचायत कार्यालयातून सर्व प्रकारचा भाजीपाला पुरविण्यात आला. रेशन दुकानात गर्दी होवू नये म्हणून टोकनव्दारे व मोबाईल सुविधाव्दारे रेशन घरपोच करण्यात आले. दुकानात गर्दी होऊ नये म्हणून किराणा दुकानदारांना ग्रामपंचायत काउंटर देऊन टोकनव्दारे व मोबाईल सुविधाद्वारे किराणा सामान घरपोच देण्यात आले. गावातील लहान मुलांचा व गरोदर महिलांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन त्यांची काळजी घेण्यात आली. लहान मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रोटीन पुरविण्यात आले.  गावातील करोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना करोनाच्या भितीपासून परावृत्त करण्यात आले, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळणारी औषधे देवून होम क्वॉरंटाईन करण्यात आले. रुग्णांना गरज पडल्यास रुग्णालयापर्यंत ग्रामपंचायतीमार्फत वाहनाची सुविधा देण्यात आली आहे.  गावातील स्वयंसेवकामार्फत गावातील शेतकऱ्यांना गर्दीत न जाण्यासाठी व गेल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी उपाययोजना व प्रबोधन करण्यात आले.  गावातील आशाताई व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन लहान मुले व गरोदर महिलांना कशी काळजी घ्यावी, याची माहिती दिली. गावातील एखादी व्यक्ती करोना पॉझिटीव्ह आल्यास जिल्हा परिषदेच्या शाळेचा हॉल विलगीकरण कक्ष म्हणून उभारला. गावातील सर्व कुंटुंबाचे सर्व्हेक्षण करुन त्यांचे संपर्क क्रमांक ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आले. गावाततील असलेल्या क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.गावकऱ्यांमध्ये जनजागृती करून एकाच टप्यामध्ये लसीकरण करण्यात आले. आज दि. 7 जून 2021 रोजी गावामध्ये 17 महिला गरोदर असून 0 ते 1.5 वषापर्यंतची एकूण 87 बालके आहेत. शेतकऱ्यांना करोना परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी जावे लागू नये यासाठी ग्रामपंचायतीने भात खरेदी केंद्र उभारुन शेतकऱ्यांकडून भात खरेदी प्रक्रिया करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे शारिरीक तापमान व ऑक्सिजन पातळी तपासण्यात येते. तसेच सॅनिटायजर  फवारल्याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयात येण्याची परवानगी दिली जात नाही. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सामाजिक अंतर ठेवणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे, या त्रिसूत्रीची डिजिटल स्क्रीनव्दारे प्रसिध्दी केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत व गावातील महिला बचतगट यांच्यामार्फत होणाऱ्या समारंभामध्ये गर्दी होऊ नये व नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून आयोजकांना सूचनावजा विनंती करण्यात येते. पिकेल ते विकेल या तत्वावर करोना काळात शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक अंतर राखून भाजपाला विक्री केंद्र तयार करुन घरपोच भाजीपाला पुरविण्यात आला.

या संवादादरम्यान मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले की, करोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव करोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी. गावात शासनाच्या सूचनांप्रमाणे विविध उपाययोजना राबवून 'माझे गाव, करोनामुक्त गाव' चे ध्येय लवकर साध्य करावे. अजूनही करोना संपलेला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. सारखा सारखा लॉकडाऊन आपल्याला परवडणार नाही. यासाठी सर्व गावांनी आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्य कसे करोनामुक्त होईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. हे काम चळवळीच्या स्वरूपात करावे. जोपर्यंत करोना आहे तोपर्यंत गावकरी सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळतील याची काळजी घ्यावी. गावात कोठेही सभा, समारंभ, लग्नसोहळे, मोर्चे, आंदोलने यासारखी गर्दी जमवणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

शेवटी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी गावात काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी हेच गावच्या व्यवस्थेच्या पाठकणा आहेत. या सर्वांनी करोनामुक्तीसाठी आतापर्यंत भरीव काम केले आहे. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन चळवळीच्या स्वरूपात काम करावे आणि करोनाला गावातून हद्दपार करावे, असे आवाहन सर्व सरपंचांना केले.

आदर्श सरपंच पोपटराव पवार म्हणाले की, संकटाच्या काळात महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चळवळी झाल्या आहेत. आता करोना संकटकाळातही करोनामुक्तीसाठी चळवळीच्या स्वरूपात काम केले पाहिजे. आपण ठरवले तर पंधरा दिवसात संपूर्ण गाव करोनामुक्त होऊ शकते. यासाठी शासनाने दिलेल्या नियमानुसार सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. स्पर्धेचे किंवा बक्षिसाचे ध्येय न ठेवता गाव संपूर्ण कोरोनामुक्त करण्यासाठी या कामाला चळवळीचे स्वरूप द्यावे.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, करोना अजूनही आहे याची जाणीव ठेवूनच आपल्याला वागावे लागेल. अजूनही अलर्ट, रेड अलर्टवर रहावे लागणार आहे. लोकांनी अजूनही करोनाबाबत थोडाही संशय आला तर टेस्ट करून घ्यावी, वेळीच दवाखान्यात दाखल व्हावे. कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यावे. करोना हा छोटासा पण चिवट विषाणू आहे. त्याने आता रूप बदलले आहे. दुसरी लाट अजून गेलेली नाही, तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळी आजारही येऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घ्यावी. मास्क हेच सर्वात प्रभावी लसीकरण आहे. जोपर्यंत संपूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत मास्क खाली करू नये.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक