मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले छायाचित्र निवडणूक कार्यालयात तात्काळ जमा करण्याचे तसेच नवमतदारांनी e-Epic मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्हयात निरंतर कार्यक्रमांतर्गत मतदारयादीचे शुध्दीकरण करण्याचे काम सुरु आहे. आजमितीस सुमारे 92 हजार मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत समाविष्ट नाहीत. त्यामुळे मतदारयादीतील छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र जमा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

ज्या मतदारांचे छायाचित्र मतदारयादीत नाहीत त्यांनी संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून स्वतःचे रंगीत छायाचित्र मतदारयादीत समाविष्ट  करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.

जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी छायाचित्र नसलेल्या मतदारांची पडताळणी केली असून, जिल्हयातील जवळपास 77 हजार 300 मतदार हे मयत, दुबार, स्थलांतरीत असल्याचे आढळून आले आहेत. मा.भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची नांवे संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कडून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

मा.भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम 2021 अंतर्गत ज्या नवीन मतदारांनी नोंदणी केलेली आहे, त्या मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेण्याची सुविधा 1) Voter Portal: http://voterportal.eci.gov.in/ 2) NVSP: https://nvsp.in/ 3) Voter Helpline MobileApp 4) Android- https://play.google.com/store/apps/details.id=com.cci.citizen  5)iOS https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id 1456535004 या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नवीन मतदारांनी वर नमूद केलेल्या माध्यमांद्वारे आपले e-Epic आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निधी चौधरी  व उपजिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती वैशाली माने यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक