रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील रायगड किल्ला परिसर येथे (दि.01 जुलै) रोजी हवाई बी पेरणी कार्यक्रम संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):-  रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील रायगड किल्ला परिसर येथे (दि.01 जुले) रोजी हवाई बी पेरणी कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे  श्री.एस.व्ही.रामाराव यांच्या हस्ते करण्यात आले.

     या वेळी उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजीत जाधव, वनक्षेत्रपाल महाड श्री.प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल म्हसळा श्री.निलेश पाटील, वनक्षेत्रपाल मुरुड श्री.प्रशांत पाटील, वनक्षेत्रपाल श्रीवर्धन श्री.मिलिंद राऊत तसेच महाड वन परिक्षेत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक पातळीवर पर्यावरण विषयक बदलत्या परिस्थितीमुळे राष्ट्रीय वननीती 1988 नुसार 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे क्षेत्र अतिदूर्गम आहे तसेच ज्या ठिकाणी पोहोचणे सुध्दा शक्य होत नाही, अशा ठिकाणी मातीची धूप होऊ नये म्हणून जैविक आच्छादन करणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिसरातील अतिउताराच्या तसेच अतिदूर्गम क्षेत्रामध्ये हवाई बी पेरणीचा प्रायोगिक कार्यक्रम राबविण्याबाबतचे निर्देश दिलेले होते.   

       त्यानुषंगाने रोहा वन विभागातील महाड वन परिक्षेत्रातील रायगड किल्ला परिसरातील हत्ती तलाव, हनुमान टाकी, दारुखाना, टकमक टोक, कोळीव तलाव, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, काळा हौद, आडवा तट, बाराटाकी, कुशावर्त तलाव, हिरकणी बुरुज, मदरसा इत्यादी परिसरातील मजूरांमार्फत प्रचलित पध्दतीने वनीकरण करणे शक्य नसलेल्या अशा विखुरलेल्या स्वरुपातील एकूण 25 हेक्टर क्षेत्राची निवड सदर प्रायोगिक तत्वावर राबविण्याबाबतच्या कार्यक्रमाकरिता करण्यात आलेली होती.

     या हवाई बी पेरणीकरिता खैर, शिसम, आवळा, बांबू, बहावा, करंज, रिठा, कांचन, बैल, जांभूळ, आपटा अशा स्थानिक प्रजातींची निवड करण्यात येऊन त्यापासून 25 हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हवाई बी पेरणीकरिता सक्षम असलेल्या ड्रोनचे माध्यमातून ही सीडबॉलची पेरणी निवड करण्यात आलेल्या क्षेत्रावर करणेत आली. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या क्षेत्राचे पॉलिगॉन घेण्यात आलेले असून हवाई बी पेरणी करण्यापूर्वी बी पेरणी करतानाचे हवाई फोटोग्राफी करण्यात आलेली आहे.

     या कार्यक्रमाचे सनियंत्रण अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत पुढील तीन वर्षाच्या कालावधीपर्यंत करण्यात येणार आहे.

दि. 01 ते 06 जुलै 2021 या दरम्यान किल्ले रायगड येथील 25 हे. क्षेत्रावर हवाई बी पेरणी पूर्ण करण्यात आली आहे, असे उप वनसंरक्षक, रोहा वनविभाग, रोहा आप्पासाहेब निकत यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक