नौकामालकांनी आपल्या नौकेचा पूर्ण जोखमीचा विमा व त्यावर कार्यरत असणाऱ्या प्रत्येक खलाशांचा किमान रूपये 5 लक्ष किंमतीचे विमाछत्र घेणे आवश्यक

 


अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका):- सागरी मासेमारी करणाऱ्या नौकामालक, मच्छिमार बंधू-भगिनींना गेले निसर्ग चक्रीवादळ व यावर्षीचे तौक्ते चक्रीवादळ यांचा फार वाईट अनुभव आला आहे. समुद्रामध्ये कार्यरत असलेल्या नौकांचे वादळी वारे व सागरी लाटांच्या माऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले.

              या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत अशा नुकसानग्रस्त नौकांकरीता देण्यात येणारी मदत तुटपुंज्या स्वरूपाची आहे.

मच्छिमार नौकांचा आपत्ती जोखमीचा विमाही अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचा असतो. यामुळे अर्थातच वादळामुळे वा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नौकेची हानी झाल्यास पुरेशा स्वरूपाचे विमाछत्र असल्यामुळे नुकसान भरपाई आवश्यकतेप्रमाणे मिळत नाही. यामुळे नौका मालकाचे फार मोठे नुकसान होते.

              हे खलाशी सामान्यत: अतिशय गरीब कुटुंबातील असतात. ज्यावेळी नौका मासेमारीसाठी समुद्रामध्ये कार्यरत असते त्यावेळी हे खलाशी नौकेवरच राहतात. तेथेच त्यांचा निवारा व आसरा असतो. नौका जरी बंदरावर आली तरी हे सर्व खलाशी नौकेवरच राहत असतात. बंदरावर त्यांना आवश्यक तेवढा आसरा/सुविधा निश्चितच उपलब्ध नाही.

              या सर्व नौकांवर कार्यरत असणाऱ्या खलाशांचे  विमाछत्रदेखील तुटपुंजे आहे. या सर्व खलाशी वर्गाचा विचार केला तर असे दिसून येते की, एका खलाशाच्या पाठीमागे त्याचे सर्व कुटुंब उदरनिर्वाहाकरीता त्या एका खलाशावर अवलंबून असते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी एखाद्या मासेमारी नौकेला अपघात झाला, त्यात एखादा खलाशी बेपत्ता झाला वा मृत्युमुखी पडला तर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

             या अनुषंगाने सर्व नौकामालकांनी आपल्या नौकेचा पूर्ण जोखमीचा विमा व त्यावर कार्यरत असणाऱ्या प्रत्येक खलाशांचा किमान रूपये 5 लक्ष एवढ्या किमतीचे विमाछत्र घेणे आवश्यक आहे.शासनाकडून जी मदत देता येईल ती निश्चितच त्याच्या वारसांना देण्यात येते. त्याशिवाय नौकामालकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे की, जो खलाशी आपल्या नौका मालकाला व त्याच्या कुटुंबियांना सुखात व समाधानात ठेवण्यास कार्यतत्पर असतो, तेवढीच नौका मालकाची देखील नैतिक जबाबदारी आहे की, अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व बेपत्ता झालेल्या खलाशांच्या कुटुंबाला चांगली मदत करावी, त्यामुळे   नौकामालकांनी आपल्या नौकेचा पूर्ण जोखमीचा विमा व त्यावर कार्यरत असणाऱ्या प्रत्येक खलाशांचे किमान रूपये 5 लक्ष किंमतीचे विमाछत्र घेणे आवश्यक आहे, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड - अलिबाग श्री.सुरेश रा. भारती यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक