पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्य हस्ते खावटी योजना कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न

 



 

अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- राज्य शासनाच्या वतीने गरीब समाज असणाऱ्या आदिवासी कुटुंबासाठी खावटी वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना खावटी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ (दि.17 जुलै) रोजी तहसिल कार्यालय, खालापूर येथे पालकमंत्री कु.आदिती  तटकरे यांच्या हस्ते  पात्र लाभार्थ्यांना खावटी अन्नधान्य कीट वाटप देवून संपन्न झाला.

              यावेळी आदिवासी विकास विभाग ठाणे अपर आयुक्त श्री.गिरीश सरोदे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, सहायक प्रकल्प अधिकारी श्री.खेडकर, तहसिलदार इरेश चप्पलवार, खालापूरचे पोलीस उपअधीक्षक श्री. संजय शुक्ला तसेच खालापूर खावटी वाटप समिती प्रमुख श्री.रमेश चव्हाण, श्री. एस. डी.पाटील आदि उपस्थितीत होते.

             यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण लाभार्थी संख्या 48 हजार 565 असून रुपये 2 हजार  लाभ मिळालेल्या लाभार्थीची संख्या 39  हजार 931 आहे तर जिल्ह्यासाठी एकूण 40 हजार 323 किट प्राप्त झाले आहेत. खावटी योजना आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना असून या योजनेचा अधिकाधिक लाभ आदिवासी बांधवांना द्यावा, असे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनाही  अन्नधान्य खावटी किट वाटप करण्यात येणार असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, महिला बालकल्याण विभागांतर्गत आदिवासी बांधवांसाठी अनेक योजना आहेत त्यांचाही  लाभ आदिवासी बांधवांना देण्यात यावा.  तसेच जे आदिवासी स्थलांतरित आहेत आणि आता आपल्या वाड्या-वस्त्यांवर आलेले आहेत, त्यांनाही  खावटी अन्नधान्य कीट देण्यासाठी कार्यवाही करावी.

             जिल्ह्यात कोविड-19 चे लसीकरण सुरु असून प्रत्येक आदिवासी बांधवाने आपले लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना केले.

             या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. सचिन मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.रमेश चव्हाण  यांनी मानले.

    कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक