भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने "छतावरील पाऊस पाणी संकलन व भूजल पुनर्भरण" आणि "पाणी गुणवत्ता" विषयावरील वेबिनार संपन्न

 


     अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका) :-भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने यंत्रणेकडून जनसामान्यांपर्यंत भूजला बाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी व भूजल पुनर्भरण ही एक लोकचळवळ निर्माण होऊन, पाणी टंचाई वर मात करण्याच्या दृष्टीने भूजल साक्षरता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 5 व 6 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रायगड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने खास शेतकर्‍यां करिता वेबिनार आयोजित करण्यात आले होते.

    या कार्यशाळेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांनी सांगितले की, पाणी हा खरतर सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. पण पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बरोबरच सिंचनासाठी आवश्यक असणा-या  पाण्याच्या टंचाईवर सुध्दा मात करणे अत्यावश्यक आहे. यावेळी त्यांनी अनेक शेतक-यांना या वेबिनारमध्ये  सहभागी होण्याचे आवाहन केले. नैसर्गिक तसेच मानवाच्या  कृतीमुळे तयार झालेले खड्डे किंवा खाणी असतील त्यांचा उपयोग पाणी साठवण्याकरिता कसा करता येईल याबाबतही भूवैज्ञानिकांनी मार्गदर्शन करण्याची मागणी केली.

  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मल्लिनाथ कलशेटटी , संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा  महाराष्ट्र राज्य, पुणे हे उपस्थित होते. त्यांनी 'भूजल साक्षरता अभियान' ही एक लोकचळचळ होणे आवश्यक असल्याचे सांगितले, तसेच कोकण विभागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असतानाही, पाणी टंचाई का भासते यावर अभ्यास करुन त्यावर प्रादेशिक उपाययोजना करुन मात करता येऊ शकते, असे प्रतिपादन केले.

 डॉ.प.ल.साळवे, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कोकण विभाग यांनी यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेपासूनची वाटचाल  याबाबत माहीती देत या चा उददेश व कृषी विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी भूजल सवंर्धनासाठी एकत्रितरित्या निभावायची भूमिका याबाबत माहिती दिली.

डॉ.एच.एम.संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी रायगड जिल्हयाची भूशास्त्रीय रचना व 'छतावरील पाऊस पाणी संकलन' या विषयावर सादरीकरण दिले. तसेच आपण बंद पडलेल्या खाणी किंवा स्ट्रक्चर यांचा पाणी साठवणे व पाणी जिरविण्यासाठी कसा उपयोग करुन घेऊ शकतो याबाबत माहिती दिली. तसेच हा कार्यक्रम ऐकण्यापुरता मर्यादित न राहता यावर कृती करण्याचे आवाहन केले.

      यावेळी श्री.एम.जी. वगारे, कनिष्ठ रसायनी यांनी पाणी गुणवत्ता या विषयावर सादरीकरणाव्दारे मार्गदर्शन केले़. पिण्याच्या पाण्यातील रासायनिक व जैविक निकष तसेच सिंचनासाठी पाण्याचे निकष व वेगवेगळया क्षारतेचा पिण्यावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतक-यांनी माती परीक्षणाबरोबरच पाणी  परिक्षण करुन त्याप्रमाणे पिके घ्यावीत तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर करणे टाळावे, असे आवाहन केले. उपस्थितांच्या प्रश्नांचे व शंकांचे चर्चेव्दारे निरसन  करण्यात आले.

यावेळी स्वदेश फाऊंडशनचे श्री.अविनाश खामकर  यांनी  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबददल शुभेच्छा देत शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त असा कार्यक्रम आयोजित केल्याबाबत कृषी विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या सर्व उपस्थितांच्या वतीने आभार मानले.

   या वेबिनार च्या संपूर्ण समन्वयाची भूमिका श्रीमती  सुषमा चौधरी, तांत्रिक अधिकारी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रायगड यांनी पार पाडली. तसेच या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये 179 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक