प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):-  पावसाने खंड दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला आहे. काही ठिकाणी भात पिकाची लावणी खोळंबली. अपुऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी जमिनीला भेगाही पडल्या आहेत. रोग व किडीचा प्रादूर्भाव झाल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील सल्ला मार्गदर्शक ठरेल.

      भात रोपवाटिकेत ताण बसत असल्यास बाह्यस्त्रोतातून विहीर/बोअरवेल इत्यादी पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच पुर्नलागवड केलेल्या भात खाचरामध्ये पहिल्या 30 दिवसापर्यंत पाण्याची पातळी 2.5 ते 5 से.मी. पर्यंत गरजेनुसार बाह्य स्त्रोतातून पाण्याची उपलब्धता करून नियंत्रित करावी.

     पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावासाची तसेच दि.09 व 10 जुलै 2021 रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता पावसाचा अंदाज घेऊनच भात लागवडीची कामे हाती घ्यावीत. शक्य असल्यास बाह्यस्त्रोतातून पाण्याची उपलब्धता करून भात पुर्नलावगड करावी अन्यथा पुढे ढकलावी.पुर्नलागवड केलेल्या भात खाचरामध्ये लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने किडीच्या प्रादूर्भावाचे निरीक्षण करावे, त्यांच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरी फॉस 1.5 टक्के भुकटी वारा शांत असताना धुरळावी.  शेतातील बांध तणमुक्त ठेवावेत.

पाणथळ भागातील भात पिकावर खाचरात पाणी साचून राहिल्यामुळे सुरळीतील अळीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याने किडीच्या प्रादूर्भावाचे सातत्याने निरीक्षण करावे. त्याच्या नियंत्रणासाठी बाहेरून पाणी उपलब्ध करणे शक्य असल्यास भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे कीडग्रस्त पिकावर एक दोर आडवा धरून ओढत न्यावे. त्यामुळे सुरळया एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात व नंतर शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी.भात पिकावरील खोडकिडा तसेच नागली व वरी पिकावरील लष्करी अळी रोगाच्या नियंत्रणासाठी कारटॅप हायड्रोक्लोराईड 4 टक्के दाणेदार 7.5 किलो ग्रॅम किंवा क्लोरनायट्रोनिलीपोल 0.4 टक्के दाणेदार 4 किलो ग्रॅम किंवा फिप्रोनील 0.3 टक्के दाणेदार 8.3 किलो ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात किडनाशकाची पहिली मात्रा, पुर्नलागवडीपूर्वी 2-3 दिवस अगोदर जमिनीत पुरेसा ओलावा असताना रोपवाटिकेमध्ये दयावी, असे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड