भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा--मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका):- पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी  आज येथे केले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, अलिबाग रायगड व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  रायगड जिल्ह्यातील भूस्तरीय रचना व पाऊस पाणी संकलन व पाणी गुणवत्ता या विषयांवरील जिल्हास्तरीस ऑनलाईन वेबिनार मध्ये ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील म्हणाले की, रायगड जिल्हा हा जरी जास्त पर्जन्यमानाच्या विभागात मोडत असला तरीही येथील भौगोलिक रचनेमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी दुष्काळ व पाणी टंचाई प्रश्नास सामोरे जावे लागते. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून पाण्यांचे संकलन करणे व त्याव्दारे भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरांवर गटविकास अधिकारी यांनी योग्य नियोजन करावे. पाणी बचत तसेच टंचाई निवारणासाठी लोकसहभागातून पाणी स्त्रोत बळकटीकरण तसेच तलावातील गाळ काढण्याची कामे भूजल संवर्धनांकरिता प्रत्येक शासकीय तसेच खाजगी इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, बोअर वेल रिचार्ज, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन इ. कार्यक्रमही हाती घेतला पाहिजे. पाण्याच्या शुदधतेसाठीची जाणीव व पाण्याचा योग्य वापराविषयीचे ज्ञान याकरिता ग्रामपंचायतस्तरांवर याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे यासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 वेबिनारचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यांनी सांगितले की ज्याप्रमाणे राज्य हागणदारीमुक्त झाले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी सर्वांनी सांधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे.  भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग घ्यायला हवा.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता डॉ. ज्ञानदा फणसे यांनी पाणी गुणवत्ता नियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी सर्वानी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे, असे सांगितले. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, अलिबाग-रायगड श्री. एच. एम. संगनोर यांनी शास्त्रोक्त पदधतीने जलसंवर्धन करणे पाणलोट क्षेत्र रायगड जिल्हयातील भूस्तरीय रचना व पाऊस पाणी संकलन या विषयांवर संगणकीय सादरीकरणाव्दारे सविस्तर मार्गदर्शन केले. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे राससायनिक व अणुजैविक पाणी नमुने तपासणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी योग्य पद्धतीने नियमित शुदधीकरण प्रक्रिया याबाबत श्रीमती एस. एस. पासलकर कनिष्ठ रसायनी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कोकण भवन यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.जयवंत गायकवाड यांनी पाणी शुध्दीकरणाच्या विविध पध्दती व त्यामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.

या वेबिनार करिता सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, BRC,CRC व जलसुरक्षक दूरचित्रवाणीच्या माध्यमांतून उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक