“आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75” युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने देशभरात आयोजित केलेल्या फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 


अलिबाग, जि.रायगड दि.13 (जिमाका) :- आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75 च्या महोत्सवाचा भाग म्हणून युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने देशभरात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजित केले आहे.  दि.12 मार्च 2021 रोजी आझादी का अमृत महोत्सवाच्या वेळी भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन प्रसंगीच्या भाषणातून प्रेरणा घेऊन, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने कृती आणि संकल्पांच्या आधारे आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75 साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे. या फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने केले आहे.

फिट इंडिया फ्रीडम रन ची कल्पना गेल्या वर्षी कोविड -19 महामारीच्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आली होती. त्यावेळी सामाजिक अंतर ठेवून राहाणे, ही नवीन सामान्य जीवनशैली बनली होती, जेणेकरून सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करतानाही फिटनेसची अत्यावश्यक गरज कायम ठेवता येणार होती. फिट इंडिया फ्रीडम रन  व्हर्च्युअल रन या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. याचाच अर्थ 'आपण ​​कुठेही, कधीही पळू शकतो,त्यासाठी आपण आपल्या आवडीचा मार्ग निवडू शकतो, आपल्याला अनुकूल अशी वेळ निवडू शकतो.  म्हणजेच फिट इंडिया फ्रीडम रन व्हर्च्युअल रन या संकल्पनेनुसार आपण आपली स्वतःची शर्यत, आपली स्वतःची वेळ, आपली जागा आपणच निवडू शकतो.

मागील वर्षी या मोहिमेचा पहिला टप्पा दि. 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत आयोजित करण्यात आला होता.  यामध्ये केंद्रीय/राज्य विभाग आणि केंद्रीय सशस्त्र सेना, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, शाळा, व्यक्ती, युवा क्लब यासह 5 कोटीहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होतो आणि त्यांनी सुमारे 18 कोटी किमी अंतर पार पाडले होते.

 यावेळी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाले असून याची सांगता दि.2 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या फिटनेस उपक्रम घेण्यास प्रोत्साहित करणे आणि लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव यापासून मुक्तता मिळविणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  या मोहिमेद्वारे नागरिकांनी त्यांच्या जीवनात दररोज किमान 30 मिनिटांच्या शारीरिक हालचालींचा समावेश करण्यासाठी "फिटनेस की डोस.. आधा घंटा रोज" या घोषवाक्यासह संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवा कार्यक्रम आणि क्रीडा केंद्रीय मंत्री श्री.अनुराग सिंह ठाकूर आणि राज्यमंत्री, युवा व्यवहार आणि क्रीडा, श्री.निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते दि.13 ऑगस्ट 2021 रोजी या उपक्रमाचा आभासी शुभारंभ संपन्न झाला. यावेळी बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, रेल्वे, एनवायकेएस, आयटीबीपी, एनएसजी, एसएसबी सारख्या देशभरातील प्रतिष्ठित संस्था विविध ठिकाणांहून सामील झाल्या.  याशिवाय देशभरातील विविध ऐतिहासिक ठिकाणी 75 प्रत्यक्ष कार्यक्रम संपन्न झाले.

यानिमित्ताने युवा कार्यक्रम आणि क्रीडा केंद्रीय मंत्री श्री.अनुराग सिंह ठाकूर यांनी आवाहन केले की, जसे आपण भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत आहोत, त्यादृष्टीने आपण स्वत: सुदृढ आणि निरोगी भारतासाठी संकल्प केला पाहिजे. देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये सर्वांनी भाग घ्या आणि त्यास लोकचळवळ बनवा.

 यानंतर दि.2 ऑक्टोबर 2021 पर्यंत 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये प्रत्येक आठवड्याचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असून अशा प्रकारे, 744 जिल्ह्यांमध्ये, 744 जिल्ह्यांमधील 75 गावांमध्ये आणि 30,000 शैक्षणिक संस्थांमध्ये फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजित केले जाणार आहे.  या उपक्रमाद्वारे अंदाजे 7 कोटी 50 लक्ष पेक्षा अधिक तरुण आणि नागरिक धावण्याच्या या उपक्रमात भाग घेतील, असा अंदाज आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक