पूरग्रस्तांना मदत करताना सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्याच्या साधनांना प्राधान्य द्यावे --जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):-  महाड व पोलादपूर मध्ये नुकत्याच आलेल्या महापूरामध्ये महाड शहराबरोबरच पोलादपूर व महाड तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे . शासन , सामाजिक संस्था व अनेक स्वयंसेवी लोक पूरग्रस्त लोकांना मदत करीत आहेत, यामध्ये बऱ्याचदा गरज  नसणाऱ्या वस्तूही देणगी स्वरूपात पूरग्रस्तांना मिळत आहेत.  सध्या पूरग्रस्तांना कशा प्रकारे मदत करायची,  हे जाणून घेण्यासाठी स्वदेस फाउंडेशने  ग्रामविकास समितीसाठी डिजिटल स्वदेस अंतर्गत वेबिनार चे काल (दि.01 ऑगस्ट) रोजी आयोजन करण्यात आले होते.  यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पूरग्रस्तांना मदत करताना सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्याच्या साधनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, पूरग्रस्तांना मदत करताना वैयक्तिक स्वच्छतेसाठी नेलकटर, कंगवा, सॅनिटरी नॅपकिन, मच्छर अगरबत्ती व मच्छर पासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे आवश्‍यकतेनुसार वाटप करावे. ताप ,थंडी,उलट्या येत असल्यास 12 वर्षावरील सर्वांसाठी  डॉक्ससीसीलाइन, 12 वर्षाखालील मुलांसाठी अमोक्सिसिलिन, 5 वर्षाखालील मुलांना हगवण, उलट्या येत असल्यास ओआरएस ( जलसंजीवनी) देणे गरजेचे आहे, घरगुती  जलसंजीवनी  तयार करण्यासाठी दीड  चमचा मीठ, सहा चमचा साखर व उकळलेले पाणी घ्यावे, एकत्रित करून मिश्रण तयार करावे व पिण्यासाठी द्यावे, पूरग्रस्तांना मदत करताना प्लास्टिकच्या बाटली मधून पाणी न देता 15 ते 20 लिटर चे कॅन द्यावेत. ताप असल्यास कोविड टेस्ट करून घेणे गरजेचे आहे, अंगावर कोणत्याही प्रकारचा आजार काढू नये. पूरग्रस्तांना करोना झाल्यास त्यांना घरातच विलगीकरण करण्यात येईल व  चांगल्या प्रकारची औषधे देण्यात येतील व दररोज पाठपुरावा करण्यात येईल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आपत्ती उद्भवू नये, या संदर्भात कोणत्या प्रकारे काळजी घ्यायची याविषयी माहिती दिली व पूरग्रस्त गावांमध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावायची याबाबत मार्गदर्शन केले. पूरग्रस्तांना संसाराला उपयोगी पडणारी भांडी, नवीन कपडे व स्वच्छतेस उपयोगी पडणारे सामानाचे वाटप करावे करण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी  केले.

यावेळी पूरग्रस्तांना मदत केलेल्या 18 ग्राम विकास समितीने या वेबिनारच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी स्वदेस फाउंडेशन करत असलेल्या कामाचे कौतुक केले. स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले व  उपसंचालक तुषार इनामदार, प्रदीप साठे यांनी पूरग्रस्तांना मदत करताना आलेले अनुभव कथन केले. या वेबिनारचे श्रीमती नीता हरमलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक