कृषी विभागाच्या विविध योजनांतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार प्रथम प्राधान्याने लाभ

 


अलिबाग,जि.रायगड दि.4 (जिमाका) :-  महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये दिनांक 21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला महापूर आला. या महापूराचे पाणी महाड शहरामध्ये घुसले, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरामधील अनेकांची शेतीसुद्धा पाण्याखाली गेली.

            दि. 24 जुलै रोजी महाड नगरपालिकेच्या  इमारतीमध्ये खासदार श्री. सुनिल तटकरे,  पालकमंत्री कु.आदिती तटकरे  आमदार भरत गोगावले,  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी,  जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांच्या उपस्थितीत   सर्व विभागांचे अधिकारी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.

            दि. 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर या तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत प्रथम प्राधान्याने लाभ देण्याचे निश्चित झाले. कृषी विभागाकडून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या पुढील विविध योजनांतर्गत लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना - शेती व्यवसाय करताना विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्य ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण प्राप्त आहे. यामध्ये खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई - वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना लाभ देय आहे.  अपघाती मृत्यू झाल्यास किंवा दोन अवयव निकामी झाल्यास या योजनेंतर्गत रु. 2 लाख इतका विमा लाभ मिळतो. तसेच एक अवयव निकामी झाल्यास रु. 1 लाख इतका विमा लाभ मिळतो.

दि.21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून महाड तालुक्यात तळीये गावातील 84 नागरिकांचा मृत्य व 5 नागरीक जखमी झालेले आहेत. तसेच पोलादपूर तालुक्यातील 11 नागरिकांचा मृत्यू झाला असून 16 नागरीक जखमी झालेले आहेत. यापैकी प्रत्येक खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील 1 सदस्य अशा दोघांना लाभ देण्यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये  विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विमा प्रस्ताव तयार करून युनिव्हर्सल संपो या विमा कंपनीस  पाठवण्यात येणार असून विम्याची रक्कम दि.15 ऑगस्ट 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना - ही योजना जिल्ह्यामध्ये भात व नागली या पिकासाठी लागू करण्यात आलेली असून भात पिकासाठी प्रति हेक्टरी रु. 45 हजार 500 व नागली पिकासाठी प्रति हेक्टरी रु. 20हजार  इतके विमा संरक्षण लागू आहे. पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या व अतिवृष्टी व  नुकसान झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश विमा कंपनीस देण्यात आलेले असून 15 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची देय रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

 अतिवृष्टी व पुरामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच नदी प्रवाह बदलामुळे शेतजमीन खरडून जावून भात खाचरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकाबरोबर वाहून गेलेल्या, रेजगा साचलेल्या शेतजमिनीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.  

महाड व पोलादपूर तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्यामुळे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या अनुषंगाने माणगाव तालुक्यातील - 9, पाली तालुक्यातील 10, तळा तालुक्यातील 8 व रोहा तालुक्यातील 4 अशा एकूण 30 कृषी सहाय्यक यांची महाड व पोलादपूर तालुक्यात पंचनामे करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. आज अखेर 100 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत

 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्याकडे आत्मा अंतर्गत 90 दिवसात येणाऱ्या कर्जत 184 या कमी कालावधीच्या भात वाणाचे 16 क्विंटल बियाणे उपलब्ध असून जे शेतकरी रोहू पद्धतीने नुकसानग्रस्त क्षेत्रात भात पिकाची लागवड करू इच्छितात त्यांना हे बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहेत.

            राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात पड क्षेत्रात कडधान्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत रब्बी हंगामामध्ये महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाल, चवळी, मूग इत्यादी पिकांच्या सुधारीत जातींचे बियाणे मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 8 लाख इतका निधी कृषी आयुक्तालायकडून मंजूर करण्यात आलेला आहे.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत उपजीविका घटकांचा लाभ देण्यासाठी महाड तालुक्यासाठी 3 प्रकल्प मंजूर असून शेतमजूर, कारागीर यांना रु. 10 हजार फिरता निधी, स्वंयसहायता गटांना रु. 25 हजार फिरता निधी, गटांचे फेडरेशन यांना रु. 2 लाख (खर्चाच्या 50 टक्के), तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांना पशुधन खरेदी, यंत्र खरेदी यासाठी खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 30 हजार इतके अनुदान दिले जाणार आहे. या घटकांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागामार्फत पुढील एक महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यासाठी आवश्यक निधी वसुंधरा पुणे कार्यलयाकडून लवकरच प्राप्त होणार आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी चारा पिके लागवड करण्यास तयार होतील त्यांना कृषी विद्यापीठ दापोलीचे निळे संशोधन केंद्र येथून चारा पिकाचे ठोम्ब आत्मा अंतर्गत मोफत पुरवठा करण्यात येणार आहेत.

            कृषी सेवा केंद्र संघटनेमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी  भाजीपाला  लागवड करू इच्छितात त्यांच्यासाठी बियाणे किटचेही वाटप करण्यात येणार आहे.

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भात खाचरांची दुरुस्ती, बांध बंदिस्ती इत्यादी कामे पावसाळा संपताच हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक