जलजीवन मिशन अंतर्गत गावस्तरीय गाव कृती आराखडा प्रशिक्षण संपन्न

 


अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका):- जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गाव कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली गावकृती आराखडा अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरांवरील यंत्रणेचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.

          रायगड जिल्हयांतील ग्रामीण भागातील 809 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 841 महसुली गावांचे जल जीवन मिशन अंतर्गत कृती आराखडे तयार करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने हाती घेतली आहे.त्यासाठी 22 जुलै ते 7 ऑगस्ट 2021 या दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा राबविण्यात येत आहे. जिल्हयांत ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबांपर्यंत नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्याचे उदिष्ट हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्तरांवर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत गावांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई आणि युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोबो कलेक्ट टूल या मुक्त स्त्रोत पदधतीच्या डिजिटल माध्यमाचा वापर व माहिती संकलित करून गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रथमच केला जात आहे, ज्याव्दारे ग्रामपंचायतस्तरांवरून एकाच वेळी आराखडे प्राप्त होणार आहेत.

या आराखडयांच्या पडताळणीनंतर आराखडयांना दि.15 ऑगस्ट 2021 च्या संभाव्य ग्रामसभेत किंवा ग्रामपंचायत सभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हयांतील सर्व ग्रामपंचायत स्तरांवरील यंत्रणेला दूरचित्रप्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये जिल्हयांतील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक,पंप ऑपरेटर,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे दोन सदस्य यांचे एकदिवसीय  प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) डॉ.ज्ञानदा  फणसे यांनी केले. पाणी व स्वच्छता कक्षातील  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.जयवंत गायकवाड,मनुष्यबळ विकास सल्लागार श्री.आनंद धिवर, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार श्री.सुनील माळी, पाणी गुणवत्ता सल्लागार श्रीम.अदिती मगर, कनिष्ठ अभियंता श्रीम.स्मिता पाटील,विस्तार अधिकारी (पं) श्री.अविनाश घरत,कर्जत तालुक्याचे गट समन्वयक  प्रविण म्हात्रे  यांनी सहभागी होत ग्रामपंचायतस्त्‍ारीय यंत्रणेला मार्गदर्शन केले.

जल जीवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या पंधरवडा अभियानादरम्यान घराघरात पिण्याचे शुदध व मुबलक पाणी उपलब्ध होईल, यासाठी जिल्हयांतील प्रत्येक गावाने सहभागी होऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील  तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक