कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-  सद्य:स्थितीत कोविड-19 आजाराची परिस्थिती लक्षात घेता, कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने उपचार देण्यात यावेत, यासाठी अवर सचिव, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्या पत्रान्वये दिव्यांग व्यक्तींना कोविड-19 करिता करण्यात येणारी तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सर्व केंद्रांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी राज्यातील कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याबाबत कळविण्यात आले.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 25 (1) (क) नुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता त्यांच्या आजाराची दखल घेणे व त्यांना उपचारात प्राधान्य देणे आवश्यक आहे.    

सद्य:स्थितीत राज्यातील कोविड-19 आजाराची परिस्थितीत दिव्यांगांना या आजाराबाबत तपासणी, उपचार व लसीकरण करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागत आहे. दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने त्यांना कोविड-19 या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त प्रमाणात उद्भवतो. तसेच प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी व रांगेत जास्त वेळ उभे राहणे कष्टप्रद, त्रासदायक ठरते. दिव्यांग व्यक्तींच्या शारीरिक क्षमता लक्षात घेवून त्यांच्यासाठी वेगळी रांग करावी, जेणेकरून त्यांना जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही व त्यांची गैरसोय होणार नाही. तसेच राज्यातील कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत व त्यांना या बाबींसाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी,अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फेही देण्यात आल्या आहेत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक