रायगडकरांची स्वप्नपूर्ती… शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

 



 

अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका) :-  अखेर तो दिवस आला…रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली… अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आरसीएफ शाळा, लेक्चर हॉल, कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

लवकरच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रकिया सुरू होणार असून, रायगडसह कोकणातील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  यावेळी केले. रायगड जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मूलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहणार नाही आणि त्यातून आरोग्य स्वयंपूर्ण रायगड वेगाने मार्गक्रमण करताना दिसून येणार आहे. रायगड जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नीत 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक बांधकाम, यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने मान्य़ता दिली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील ऊसर येथे 52 एकर जमीनीवर हे महाविद्यालय उभे राहाणार असून, या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वीच शासनाने मान्यता दिली आहे. आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्ण खाटांच्या रुग्णालयासाठी पुढील चार वर्षात एकूण एक हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्यासाठी येणाऱ्या 61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजुरी दिली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय तातडीने कार्यान्वित होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ 44 अध्यापकांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याविषयीचे आदेशही जारी झाल्याचे पालकमंत्री कु तटकरे म्हणाल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अलिबाग येथे सुरु करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाची जागा अपुरी पडत असल्याने आरसीएफच्या कुरुळ वसाहतीमधील जुनी शाळा, टाईप ए रेसिडेन्सी क्वॉर्टरच्या सहा इमारती, तसेच शाळेजवळची सहा एकर मोकळी जागा तीन वर्षासाठी भाडेतत्वावर घेतली असून, तसा सामंजस्य करारही झाल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले.

जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचाही विचार असल्याचे सांगतांना या रुग्णालयाच्या आवारातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित दुरुस्ती कामासाठी जिल्हा नियोजनमधून 35 लाख, तर महाविद्यालयासाठी पुस्तके व नियतकालिके खरेदीसाठी 63 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी 106 कोटी 96 लाख 53 हजार 798 रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असून, महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी दोन कोटी 98 लाख 53 हजार 798 रुपयांच्या निधीसही मंजुरी मिळाली आहे.

या पत्रकार परिषदेस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे,  अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, कार्यकारी अभियंता श्री.जगदिश सुखदेवे, तहसिलदार सचिन शेजाळ, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, आरसीएफचे शांताराम देशमुख, भालचंद्र देशपांडे, प्रमोद देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक