राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींबाबत जनजागृतीपर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्य निर्मिती (औषधी वनस्पती रोपवाटिका), औषधी वनस्पती लागवड काढणोत्तोर व्यवस्थापन प्रक्रिया व मूल्यवर्धन इ. घटकांसाठी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि अशा शेतकऱ्यांना या घटकांचा लाभ घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे, यासाठी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक आत्मा श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत आयोजित केली होती.

या कार्यशाळेच्या माध्यमातून औषधी वनस्पती लागवड साहित्याची निर्मिती कशी करावी, औषधी वनस्पतींचे फायदे व कोणत्या वातावरणात या वनस्पती लागवड केल्यानंतर आपणास त्यापासून भरघोस उत्पन्न मिळू शकते, याबाबतचे मार्गदर्शन डॉ. दिगंबर मोकाट, प्रमुख शास्त्रज्ञ, विभागीय औषधी वनस्पती प्रोत्साहन केंद्र, पुणे विदयापीठ, पुणे यांनी केले आणि इतर काही महत्वाच्या मुद्यांवर प्रशिक्षणही दिले. तसेच औषधी वनस्पतींची लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत मिळणाऱ्या सबसिडी योजनेबाबत श्री.ए.आर. सासिवेकर, अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ पुणे यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती या कार्यशाळेत दिली.

 त्याचप्रमाणे औषधी वनस्पती लागवड केल्यानंतर पणन (Marketing) सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व शेतकऱ्याच्या यासंदर्भातील अडचणी याबाबत श्री. प्रशांत नायर, दातार अँड सन्स, पनवेल यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींच्या लागवडीकरीता अनुकूल वैविध्यपूर्ण हवामान, मानवी आरोग्याकरिता औषधी वनस्पतीचे महत्त्व, वाजवी उत्पन्न देणाऱ्या औषधी वनस्पतींची नगदी पिके, औषधी वनस्पती क्षेत्रात स्वयंरोजगार निर्मिती इत्यादी बाबींच्या अनुषंगाने औषधी वनस्पती क्षेत्र विकासास भरपूर वाव आहे. तथापि याचा विचार करता जिल्हयातील औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्याचे नियोजन राष्ट्रीय आयुष अभियान औषधी वनस्पती योजनेंतर्गत करण्यात येत आहे.

    या कार्यक्रमास 50 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सन 2021-22 करिता रायगड जिल्ह्यात 45.90 हेक्टर लागवड क्षेत्राचे नियोजन केले असून त्याकरिता 694.80 लाख इतका निधी प्रस्तावित केला आहे,अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक