बँकांनी पत धोरणाच्या 100 टक्के कर्ज वितरणाचे धोरण ठेवावे --डॉ. महेंद्र कल्याणकर जिल्हा अग्रणी बँकेतर्फे महा कर्ज मेळावा संपन्न

 


 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका)- आर्थिक सेवा विभाग, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार अणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलिबागमध्ये जिल्हा अग्रणी बँकेतर्फे महा कर्ज मेळाव्याचे  क्षत्रिय समाज हॉल कुरुळ येथे यशस्वी आयोजन करण्यात आले.

              या बँक कर्ज मेळाव्यामध्ये अलिबाग तालुक्यातील 10 शासकीय बँकांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, पोस्ट पेमेंट बँक, स्वयंसहायता समूहाचे स्टॉल,स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यास अलिबाग तालुक्यातील जनतेकडून उत्तम  प्रतिसाद मिळाला.

               यावेळी जिल्हाधिकारी श्री. डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या शुभ हस्ते 35 लाभधारकांना विविध बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेले पीक कर्ज, मुद्रा  कर्ज, बचत गट कर्ज,  उद्योजक यांना मुद्रा कर्ज मंजुरी पत्र  देण्यात आले.

             जिल्हाधिकारी महोदयांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या निसर्ग चक्रीवादळ, ताउत्के वादळ, पूर परिस्थिती आणि करोना यासारख्या विविध संकटांशी सामना करणाऱ्या जनतेसाठी बँक अणि ग्राहक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी निश्चित उपयोग होईल. त्याचबरोबर बँकांनी  वार्षिक पतपुरवठा धोरणात दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यावर भर द्यावा,अशा सूचना केल्या. गेल्या वर्षी एकूण जिल्हा  पतपुरवठा रू.3 हजार 900 कोटी उदिष्ट ठरविले असताना बँकांमार्फत 2 हजार 700 कोटी कर्ज वाटप जिल्ह्यात करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर बँकांनी आपले पतधोरण उदिष्ट पूर्ण करताना केवळ ठराविक सेक्टर डोळ्यासमोर ठेऊन कर्ज वाटप न करता  सर्व सेक्टर जसे शेती कर्ज, सूक्ष्म व्यवसायिकांना कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज मध्यम व मोठ्या उद्योगांना कर्ज अशा सर्व सेक्टरला कर्ज वाटप करावे  म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सर्व सेक्टर चा विकास होऊन पर्यायाने जिल्हा समृध्द होईल. असेच मेळावे घेऊन ग्राहक आणि बँकांमधील दरी कमी करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेने असाच पुढाकार घ्यावा, तसेच याच धर्तीवर बचतगटांचे मेळावे देखील घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अग्रणी बँकेला दिल्या.

            यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी आरसेटीच्या  स्टॉलला भेट देऊन महिलांना मार्गदर्शन  केले व व्यवसायाविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे स्वयंसहायता समूहाना बँकांनी जास्तीत जास्त कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय वाढीसाठी हातभार लागून त्यांचा छोटा व्यवसाय मोठा होण्यासाठी  सर्व बँकांनी  त्यांना पत पुरवठा करून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील असावे, असेही सांगितले.

             याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबद्दल विस्तृत विवेचन केले आणि तरुण वर्गाने या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी पुढे यावे असेही आवाहन केले.

             यावेळी नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक सुधाकर रघतवान यांनी नाबार्ड च्या विविध योजना कोणत्या आहेत, कशा आहेत, त्याचे स्वरूप कसे आहे ,कर्ज मर्यादा, अनुदान या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

            मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त सुरेश भारती यांनी या मेळाव्यास शुभेच्छा देताना जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मंडळींना बँकांनी कृषी पीक कर्ज तातडीने मिळावे, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

             जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री. विजयकुमार कुलकर्णी यांनी यावेळी प्रास्तविक करताना असे मेळावे आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. विविध संकटामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मरगळ  झटकण्यासाठी आर्थिक सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली  थंडावलेले विकासचक्र गतिमान करण्यासाठी कर्ज मेळावा घेतल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे असेच मेळावे घेऊन अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यास आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आणि पुढील मेळावा दि.14 ऑक्टोबर 2021 रोजी पेण येथील गांधी वाचनालय या ठिकाणी आयोजित केला असल्याचे सांगून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

              यावेळी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी शासकीय योजनांचे महत्व व प्रसार करण्यासाठी जिल्हा महिती कार्यालय कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आणि सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.

              कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्टार कृषी विकास केंद्र प्रमुख श्री. कालिदास माने यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री. रमण  पारकर यांनी मानले आणि या महाकर्ज मेळाव्याच्या उपयुक्त संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले.

              या मेळाव्यास अलिबाग परिसरातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी कार्यक्रमास उपविभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया श्री.रमण पारकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. विजय कुलकर्णी, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, नाबार्ड चे उप जिल्हा व्यवस्थापक श्री.सुधाकर रगतवन, NRLM चे जिल्हा व्यवस्थापक  श्री.सिद्धेश राऊळ तसेच अलिबाग मधील सर्व बँकाचे शाखाधिकारी, विपणन अधिकारी, व्यवसाय प्रतिनिधी  यांची प्रमुख उपस्थिती होती.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक