दि.11 ते दि.16 ऑक्टोबर या कालावधीत रायगड डाक विभागाकडून डाक सप्ताहाचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):-  भारतीय डाक विभाग दरवर्षी आपला टपाल सप्ताह ऑक्टोबरमध्ये साजरा करतो. यावर्षीदेखील हा सप्ताह दि.11 ते दि. 16 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी ग्राहकांसाठी विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

दि.11 ऑक्टोबर बचत बँक दिवस (बँकिग डे ) व दि.12 ऑक्टोबर डाक जीवन विमा दिवस     (पीएलआय डे) या दोन्ही दिवशी सरकारी आस्थापनेत व ग्रामीण भागात डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांचे तसेच इतर सरकारी आस्थापनेत मेळावे घेऊन बचत व इन्शुरन्स याबाबतचे त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.

दि.13 ऑक्टोबर तिकीट संग्रह दिवस (फिलेटेली डे) या दिवशी अलिबाग मुख्य डाक कार्यालय येथे विविध टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. हे प्रदर्शन जनतेसाठी या दिवशी खुले असेल.

दि.14 ऑक्टोबर व्यवसाय विकास दिवस( बीझनेस डे) या दिवशी डाक विभागाशी बिझनेससाठी संबधित असणाऱ्या कार्यालयाबरोबर संपर्क साधून त्यांना डाक विभागाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे.

दि.16 ऑक्टोबर टपाल दिवस ( मेल डे ) या दिवशी शाळेतील मुलांना डाक विभागाचे कामकाज दाखवून त्या संबधित माहिती दिली जाणार आहे.  अशा प्रकारचे विविध कार्यक्रम रायगड डाक विभागात नियोजित करण्यात आले आहेत.

फार पूर्वी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी एकच डाक विभाग कार्यरत होता. आता मात्र रायगड जिल्ह्यासाठी दोन डाक विभाग कार्यरत आहेत. त्यात रायगड डाक विभागाकडे रायगडमधील 11 तालुके येतात तर उर्वरित 4 तालुके नवी मुंबई डाक विभागांतर्गत येतात.  नवी मुंबई डाक विभागाचे मुख्य कार्यालय पनवेल आहे तर रायगड डाक विभागाचे मुख्य डाक कार्यालय अलिबाग आहे.

रायगड डाक विभागात 1 मुख्य डाकघर, 44 उप डाकघरे व 286 शाखा डाकघरे अशी एकूण 331 कार्यालये आहेत. या कार्यालयातून एकूण 450 टपालपेटी जनतेच्या पत्रव्यवहारासाठी उपलब्ध आहेत. सध्या या विभागातील येणाऱ्या टपालाची संख्या दररोज सरासरी 15 हजार)  तर जाणाऱ्या टपालाची संख्या 10 हजार आहे. आज मोबाईल इंटरनेट सारख्या संवादाच्या जलद यंत्रणा उपलब्ध असतानाही मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात  जवळ जवळ 25 हजार लोक दररोज पत्रव्यवहारावर करतात यावरून टपाल विभागाची उपयुक्तता दिसून येते.

                डाक विभाग म्हणजे फक्त पत्र व्यवहार हा सर्वसामान्य जनतेचा समज डाक विभागातील कामकाजाची विविधता पाहून नक्कीच दूर होईल.  मेल(पत्रव्यवहार), इन्शुरन्स (विमा), इन्व्हेस्टमेंट(बचत) या तीन मुख्य प्रवाहाबरोबर सामजिक बांधिलकीतून केले जाणारे अनेक उपक्रम आता डाक विभाग करीत आहे. त्यामध्ये कोविड कालावधीमध्ये औषध, अन्नधान्य पाकिटे, जीवन आवश्यक वस्तू पोहचविण्याची कामगिरी उत्तम रीतीने पार पाडली आहेच. सोबत नवीन आधारकार्ड काढणे, आधार अद्यतन, घरोघरी वीज देण्यासाठी झालेला सर्वे, प्रधानमंत्री योजना इत्यादी कामात डाक विभागाने पूर्ण योगदान दिले आहे.

या डाक साप्ताहाच्या निमिताने रायगड डाक विभागाने ग्रामीण पातळीवर आर्थिक सर्व समावेशीकरण करण्याचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये गाव पातळीवर डाक विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन बचत, विमा व पत्रव्यवहारा बाबतची माहिती सर्व सामन्य जनतेला देणार आहेत. लहान लहान बचतीतून गुंतवणूक कशी करावी, खास ग्रामीण भागासाठी असणारा सरकारी विमा याची माहिती देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे. एकाच आठवड्यात पंधरा गावापर्यंत हे प्रबोधन केले जाण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, अशी माहिती रायगड डाक विभागाचे अधीक्षक श्री.अविनाश ग. पाखरे यांनी दिली आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक