जिल्हा कारागृहातील बंद्यांचे नातेवाईक, वकील यांच्या भेटीदरम्यान कोविड-19 नियमांचे पालन करणे आवश्यक

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका) :- अपर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक कारागृह व सुधारसेवा, पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 विषाणूचा सद्य:स्थितीतील प्रादूर्भाव विचारात घेता, अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या प्रत्यक्ष नातेवाईक, वकील भेटी पूर्ववत करण्याबाबत अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह यांनी पुढील अटी व शर्तीच्या आधारे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

अटी व शर्ती :- प्रत्यक्ष, समक्ष भेटी दरम्यान कोविड-19 च्या संदर्भातील सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्याची खबरदारी घ्यावी,  इंटरकॉमचे फोन रिसीव्हर प्रत्येक भेटी दरम्यान सॅनिटाईज करण्याची दक्षता घ्यावी,  कारागृहांनी विकत घेतलेले सर्व मोबाईल फोन, सिमकार्ड व सोबतची सर्व साधने  अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा पुणे यांच्याकडील दि.12 ऑक्टोबर 2021 च्या परिपत्रकामध्ये दिलेल्या निर्देशानुसार विभागीय विशेष पोलिस महानिरीक्षक कारागृह, कारागृह उपनिरीक्षक यांच्याकडे जमा करण्याची कार्यवाही करावी  तसेच संबंधित मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीशी संपर्क साधून मोबाईल नंबरची सेवा डिस्कनेक्ट करण्याची कारवाई करावी.

अलिबाग जिल्हा कारागृहात असलेल्या एकूण संख्या विचारात घेवून बंद्यांच्या प्रत्यक्ष नातेवाईक, वकील भेटी पूर्ववत करण्याबाबत केंद्र शासन व राज्य शासनाकडील कोविड-19 च्या  मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियोजन करावे, या बंद्यांच्या प्रत्यक्ष नातेवाईक, वकील भेटी दरम्यान कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यादृष्टीने बंद्यांच्या एकूण संख्येच्या सरासरीनुसार या भेटीबाबत नियोजन करावे, त्याबाबतच्या सूचना कारागृहाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध कराव्यात, भेटीदरम्यान संबंधितांचे कोविड लसीकरणाचे दोनही डोस पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, कोविड प्रतिबंधाक लसीच्या दोन मात्रा पूर्ण न झालेल्या बंद्यांचे नातेवाईक, वकील यांनी भेटीपूर्वी 48 तासाच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी दिल्या आहेत.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक