ग्रामपंचायतीत मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे निर्देश तर या विशेष ग्रामसभेत जनतेनेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदारयादीची पडताळणी व दुरूस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्याचा व दि. 01 जानेवारी या अर्हता दिनांकानुसार नवीन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो. चालू वर्षीच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

              यापूर्वी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदारयादीतील त्यांची नोंदणी तपासणी व नवीन मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदारयादीच्या चावडी वाचनाचा उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली होती.

              तथापि, आता हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचावा, याकरिता दि.16 नोव्हेंबर, 2021 रोजी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी निर्देश दिले आहेत.

            या विशेष ग्रामसभेमध्ये मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत...

               ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदारयादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पहाण्यासाठी/ तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच या यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात यावे.  गावातील सर्व नागरिकांना मतदारयादीमधील नोंदी तपासून घेण्यासाठी सांगण्यात यावे.  मतदारयादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास त्यांना विहीत अर्ज फॉर्म तेथेच ग्रामसभेत उपलब्ध करुन द्यावेत. याकरीता ग्रामपंचायत कार्यालयाने आधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय/ तहसिल कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फॉर्मचे नमुने उपलब्ध करुन घ्यावेत. या अंतर्गत मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिल्यांच्या नावाची नोंदणी, PwD मतदार चिन्हांकित करणे व ज्यांचे दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहे त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात यावा.  ग्रामसेवक किंवा संबंधित गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करावे. या कामासाठी गाव कामगार व तलाठी यांनी सहकार्य करावे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती/आक्षेप/दुरुस्ती वा नाव नोंदणींच्या अर्जाचे यांचे संकलन करुन ग्रामपंचायत कार्यालयाने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावे.  शक्य असल्यास, या ग्रामसभेमध्ये नागरिकांना ऑनलाईन नाव नोंदणी nvsp portal/ voter helpline App वरुन कशी करता येते याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी माहिती दयावी.  नागरिकांना मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदारयादीबाबतचे कामकाज कसे चालते, याची महिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी माहिती दयावी. नागरिकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे नाव, संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत.  संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी दिलेल्या हरकती/आक्षेप/दुरुस्ती वा नाव नोंदणींच्या अर्जाची स्थितीबाबत त्या नागरिकांना कोठून व कशी माहिती मिळेल, याबाबत मार्गदर्शन करावे.

               याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दि. 16 नोव्हेंबर, 2021 या रोजी संपूर्ण राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठवावा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या विशेष ग्रामसभा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होतील, याची दक्षता घ्यावी व तशा सूचना त्यांनी त्यांच्या स्तरावरुनही ग्रामपंचायतींना द्याव्यात. या संदर्भात व्यापक प्रसिध्दी गावपातळीवर होईल यासाठी संबंधीत पंचायत समित्यांनी विशेष प्रयत्न करावेत. याबाबतच्या प्रसिध्दीसाठीचा मजकूर जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावा. याची प्रसिध्दी प्रत्यक्ष ग्रामसभेच्या 10 दिवस अगोदर करावी,जेणेकरून जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग वाढेल, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

             तरी जनतेनेही मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या या विशेष ग्रामसभेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक