दूर्गम भागातील असंघटित कामगारांसाठी “ई-श्रम कार्ड” नोंदणी विशेष मोहीम राबवावी --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर “ई-श्रम कार्ड” नोंदणीसाठी असंघटित कामगारांनी, सर्व शासकीय व अशासकीय, खाजगी संस्था तसेच असंघटित क्षेत्रातील कार्यरत संघटनांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 


 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- जिल्हयातील असंघटित कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलद्वारे नागरी सुविधा केंद्रामार्फत सुरु करण्यात आली असून दूर्गम भागातील असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्डनोंदणी विशेष मोहीम राबवावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले.

ई-श्रम पोर्टलद्वारे नागरी सुविधा केंद्रामार्फत जिल्हयातील असंघटित कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे (दि.11ऑक्टोबर) रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते सुरु करण्यात आला. यावेळी नोंदीत 11 असंघटित कामगारांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ई-श्रम कार्ड चे ही वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, कामगार उपायुक्त प्रदीप पवार, सहायक कामगार आयुक्त श्रीमती शितल कुलकर्णी, श्री.समीर चव्हाण, नागरी सुविधा केंद्राचे व्यवस्थापक श्री.राजेश पाटील, श्री.विनित पाटील तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर चालक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, ई-श्रम पोर्टलद्वारे नागरी सुविधा केंद्रामार्फत जिल्हयातील असंघटित कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. मात्र या दरम्यान दुर्गम भागातील जे असंघटित कामगार सीएससी  केंद्रापर्यंत पोहचू शकत नाहीत,  अशा लोकांसाठी विभागाने त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या लोकांची ई-श्रम पोर्टलद्वारे नोंदणी करावी. याकरिता तहसिलदार, प्रांताधिकारी, विविध स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था यांच्या सहकार्याने ही नोंदणी मोहीम यशस्वीपणे राबवावी.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरीता सर्व शासकीय व अशासकीय, खाजगी संस्था तसेच असंघटित क्षेत्रातील कार्यरत संघटनांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

ई-श्रम कार्ड नोंदणीबाबत ज्या मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे, त्या  मोबाईल व्हॅनची पाहणी करुन जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी संबंधितांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दि.31 डिसेंबर 2008 रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारित केलेला असून असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उददेशाने असंघटित कामगारांचा डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने दि. 26  ऑगस्ट 2021 रोजी असंघटित कामगाराची नोंदणी करण्याकरिता ई-श्रम पोर्टल कार्यान्वित केले आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणारे म्हणजेच स्वयंरोजगार, घरेलू कामगार, असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारे कामगार, फळ व भाजीपाला विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, विडी कामगार, शेतमजूर,

रिक्षाचालक, फेरीवाले इ. कामगाराचा प्रामुख्याने समावेश होत असून सुमारे 300 उद्योग व्यवसायांमध्ये हे असंघटित कामगार कार्यरत आहेत.

या सर्व असंघटित कामगारांची ई-श्रम पोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने नागरी सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) नोंदणी करण्यात येत आहे. त्याकरीता कामगाराचे/व्यक्तीचे वय 16 ते 59 वर्षे दरम्यान असावे. तसेच नोंदणी करीता आधारकार्ड, बँकेचे पासबुक इ. कागदपत्रांची आवश्यकता असून कामगार/व्यक्ती स्वतः किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत आपली नोंदणी करु शकतात. नोंदणी केल्यानंतर या कामगारास UAN ( Universal Account Number) क्रमांक दिला जाणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक