महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि.15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे

 


 

            अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दि. 01 एप्रिल 2015 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाची दि. 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली तसेच दि. 01 एप्रिल 2015 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीककर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दि. 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासहीत थकीत असलेल्या व परतफेड न करता आलेल्या हप्त्याची रक्कम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प/अत्यल्प भूधारक या प्रकारच्या जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडील दि. 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आला आहे.

मात्र या योजनेचा लाभ मिळण्याकरिता पात्र लाभार्थ्याने आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ज्या लाभार्थ्याने कर्जमाफी मिळण्याकरिता अर्ज केलेला आहे. मात्र आतापर्यत आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ देता आलेला नाही. जोपर्यंत पात्र लाभार्थी आपले आधार प्रमाणीकरण करत नाही, तोपर्यंत त्या पात्र लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांनी कळविले आहे.

राज्यात एकूण 153 लाख शेतकरी आहेत. शेतकरी शेती आणि शेतीशी निगडीत कामांकरीता व्यापारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. राज्यात सलग 4 वर्ष विविध भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठया प्रमाणात 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच राज्यात काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची दिलेल्या मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे व त्यांना शेतीकामांना नवीन पीककर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दि. 24 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याबाबत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

तरी ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपण ज्या बँकेच्या ज्या शाखेतून कर्ज घेतले असेल त्या बँकेच्या शाखेत किंवा ई-सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण दि. 15 नोव्हेंबर 2021 पर्यत करुन घेण्यात यावे.  तसेच जे लाभार्थी मयत असतील त्यांच्या वारसांनी बँकेच्या ज्या शाखेतून कर्ज घेतले असेल अशा सबंधीत बँकेत जाऊन वारस नोंद करुन आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

तसेच ज्या लाभार्थ्याने अद्यापपर्यत आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याकरीता दि. 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. या दिनांकापर्यंत आधार प्रमाणीकरण न झाल्यास या योजनेचा लाभ लाभार्थ्यास मिळणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी व्यक्तीश: लाभार्थी व संबंधीत बँकांची राहील, असेही त्यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक