रायगड जिल्ह्यात प्रकल्प उद्यमिता घडविणार 200 उद्योजक

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका):- कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय व लेट्स इंडोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात 200 उद्योजक घडविण्याकरीता प्रोजेक्ट उद्यमिता हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून जिल्ह्यातील युवकांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शा.गि.पवार  केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय आणि लेट्स इंडोर्स संस्था यांच्या भागीदारीतून उद्यमिता हा प्रकल्प रायगड, नाशिक, पुणे आणि नांदेड जिल्ह्यात राबिवण्यात येणार आहे. याद्वारे, शेकडो अतिसूक्ष्म/सूक्ष्म/लघु उद्योजकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हयात किमान 200 उद्योजक घडविण्याचे लक्ष्य  ठेवण्यात आले आहे.

प्रकल्प उद्यमिता ही अनोख्या शैलीमध्ये इच्छुक उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उद्देशाने उभी केलेली यंत्रणा आहे. यामध्ये स्थानिक पातळीवरील व्यवसाय, बचत गटांचे लघुद्योग, गृहोद्योग, जोड-व्यवसाय, आणि इतर उपजीविकेची साधने भक्कमपणे उभी करून उद्योजकांचे उत्पादनवाढ करण्यासाठी नियोजन आणि प्रयत्न केले जाणार आहेत.

शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP ), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP ),  पंतप्रधान मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व अशा  इतर सर्व आर्थिक मागास विकास महामंडळे यासारख्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उद्योजकांना प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट) बनवून देणे व अर्जदाराला त्याचे प्राथमिक स्वरूपात  मार्गदर्शन केले जाईल. सोबतच व्यवसाय मार्गदर्शन करून बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न केले जातील व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल.एवढेच नाही तर त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा संस्था प्रयत्न व मार्गदर्शन करणार आहे.प्रोजेक्ट उद्यामिता या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही म्हणजेच या सर्व सेवा मोफत दिल्या जातील.

करोनानंतर रोजगार निर्मितीमध्ये तयार झालेली पोकळी आणि बेरोजगारी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आणि लेट्स इंडोर्से यांचा उद्यमिता प्रकल्प युवकांमध्ये उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जलद स्वयंरोजगाराद्वारे उपजीविका निर्मिती करण्यासाठी सहकार्य करणार आहे.

  या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग  किंवा कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा लेट्स इंडोर्से या संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. मनमित वासनीक यांना मो.8982156741 किंवा 75300-57575 (टोल-फ्री ) क्रमांकावर संपर्क साधावा.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड