वंचितांना अधिकार मिळवून देण्यासाठी जागृती आवश्यक--वरिष्ठ न्यायमूर्ती ए.ए. सय्यद विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यातर्गत 61 स्टॉल्सच्या माध्यमातून 3 हजार 815 लाभार्थ्यांना देण्यात आलेले विविध लाभ

 


अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- संविधानाने सर्वांना समान हक्क दिले आहेत. तरीही समाजात अजूनही मागासलेले, वंचित घटक आहेत. त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ न्यायमूर्ती,उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.ए.ए.सय्यद यांनी आज नागोठणे येथे केले.

     महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा, योजनांचा महामेळावा रोहा तालुक्यातील नागोठणे येथील रिलायन्स पेट्रोकेमिकल्स टाउनशिप मधील बालगंधर्व रंगभवन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई चे सदस्य सचिव श्री.दिनेश सुराणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे, न्यायाधीश अशोककुमार भिलारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख, तालुका बार कौन्सिलचे अध्यक्ष, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

     न्यायमूर्ती ए.ए.सय्यद पुढे म्हणाले, देशहितासाठी समाजातील सर्वच स्तरांची सर्वांगीण प्रगती होणे आवश्यक आहे. प्रत्येक वंचित घटकास, मागासलेल्या व्यक्तीस त्याच्या अधिकाराची, हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे असून यासाठीच तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विधी सेवा प्राधिकरण कार्य करीत आहे. वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्नशील आहेत. आजच्या या विधी सेवा महाशिबीर तसेच शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून जनतेत, वंचित घटकांत त्यांचे हक्क,कर्तव्य तसेच जबाबदारी याबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून देशभरातून आतापर्यंत दररोज 40 लाख लोकांपर्यंत विधी सेवांची तसेच विविध शासकीय योजनांची सेवांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत आहे. हे काम असेच अविरत सुरू राहील, असेही ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व विविध शासकीय विभागांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबाबत न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुकही केले.

     या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे या आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, समाजातील विविध वंचित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. वंचितांना त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव जागृती होण्यासाठी या उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. विधी सेवा प्राधिकरणाने हे ध्येयच ठरविले आहे की, सर्व मार्गांनी शेवटच्या माणसापर्यंत त्यांचे हक्क मिळवून द्यायचे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमती विभा इंगळे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मनोधैर्य योजना, लॉकडाऊन काळात तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्तांसाठी करण्यात आलेली मदत, कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यात आल्याचे कार्य, लसीकरण इत्यादी सेवाभावी कामांचा उल्लेख करून हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत असेच निरंतर सुरु राहील, अशी ग्वाही दिली.

     यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून प्रशासनाने वंचितांना विविध शासकीय दाखले देण्यासाठी घेतलेल्या शिबिरांबाबत, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली लसीकरण मोहीम, ऑक्‍सिजन निर्मितीतील रायगड जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान, कोविडच्या तिसऱ्या लाटेची जिल्हा प्रशासनाने केलेली पूर्वतयारी यासह रायगड जिल्ह्याच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे येत्या काळातही लोकाभिमुख, पारदर्शी, जनतेला हितकारक असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

     या कार्यक्रमाच्या निमित्ताने "माझी वसुंधरा" या अभियानाच्या जनजागृतीबाबतच्या घडीपत्रिकांचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली. त्याचप्रमाणे विविध तालुक्यातून आलेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय दाखले व लाभ देण्यात आले. विशेष बाब म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती ए.ए.सय्यद स्वतः व्यासपीठावरून खाली आले.

    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे थीम सॉंगही प्रदर्शित करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध बार असोसिएशनच्या वतीने न्यायमूर्ती ए.ए.सय्यद यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई चे सदस्य सचिव न्यायाधीश श्री.दिनेश सुराणा यांनी केले तर आभार प्रदर्शन रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री.ए.एम.मुजावर आणि दिवाणी न्‍यायाधीश (कनिष्‍ठ स्‍तर) श्रीमती एस.आर.पाटील यांनी केले.

      या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सचिन शेजाळ, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख व त्यांचे कर्मचारी, रिलायन्सचे वरिष्ठ अध्यक्ष अविनाश श्रीखंडे,अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष चेतन वाळंज तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज, नागोठणे, वरिष्ठ व्यवस्थापक रमेश धनावडे, अजिंक्य पाटील, श्रीकांत राजहंस त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाची इतर वैशिष्ट्ये:-

न्यायमूर्ती ए.ए.सय्यद यांच्या हस्ते विविध शासकीय विभागांच्या सेवासुविधा शिबिराचे उद्घाटन संपन्न

      यावेळी न्यायमूर्ती ए.ए.सय्यद व इतर मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांच्या सेवासुविधा शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.

      यात विविध शासकीय विभागांचे एकूण 67 सुसज्ज स्टॉल्स सहभागी झाले होते. या माध्यमातून एकूण 3 हजार 815 लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व अन्य लाभ देण्यात आले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण कार्यालयाकडून सादर करण्यात आले पथनाट्य

     या महाशिबिराच्या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पेण या कार्यालयाने स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे लघुनाट्य सादर केले. यावेळी प्रकल्प संचालक श्रीमती शशिकला अहिरराव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कातकरी समाजासाठी आदिवासी विकास प्रकल्प विभागाने केलेल्या कामाबद्दलची माहिती दिली. यावेळी नायब तहसिलदार वैशाली काकडे- भाबड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मतदार नोंदणी अभियानासंदर्भात मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रिकांचे प्रकाशन संपन्न

      यावेळी मान्यवरांनी विविध निवडणूक शाखेच्या स्टॉलला भेट दिली असता उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार जागृती अभियान तसेच मतदार नोंदणी अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते मतदार नोंदणी अभियान जनजागृतीपर भित्तीपत्रिकांचे  प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे "मतदार नोंदणी आमची जबाबदारी" हे पथनाट्यही सादर करण्यात आले.

आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिराचे उद्घाटन संपन्न

      विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने येथे आलेल्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी तसेच कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.शीतल जोशी-घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर यशस्वी पार पाडले.

"माझी वसुंधरा" अभियान सायकल रॅलीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविल्याबद्दल सायकलपटूंच्या पाठीवर मान्यवरांची कौतुकाची थाप

       जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिका,नगरपंचायती क्षेत्रात सायकल रॅलीद्वारे "माझी वसुंधरा" या अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाचा, स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. या सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन तब्बल सहाशे किलोमीटरचा प्रवास केलेल्या सायकल फोटोंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या सायकल रॅली करिता उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार दिलीप रायण्णावार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संतोष तावडे, राम जोशी,अनिरुद्ध आठवले, अशोक बसवराज, दत्तात्रय पोद्दार, मकरंद नाईक विपुल शहा, अनंत खाडिलकर, ज्ञानेश्वर वरवडे या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक