जिल्ह्यातील ग्रामीण/शहरी भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना निःशुल्क सहशिक्षणाची जवाहर नवोदय विद्यालयात सूवर्णसंधी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आली आहे. देशाचे युवा पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक व विविध कलागुणांचा विकासाबरोबर आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते.

या विद्यालयातील प्रवेशासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021 तर परीक्षेची तारीख दि.30 एप्रिल 2022 अशी आहे. तसेच www.navodaya.gov.in या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय शाळातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य किरण इंगळे यांनी केले आहे.

नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून इयत्ता 12 वी पर्यंत वसतिगृहयुक्त पूर्णत निःशुल्क सहशिक्षणाची सुविधा आहे. नवोदय विद्यालयाचा पाठ्यक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारे संचालित करण्यात येतो. सुसज्ज कॉम्प्युटर व विज्ञान प्रयोगशाळा, सॅमसंग स्मार्ट क्लासरूम, प्रशस्त ग्रंथालय, क्रीडांगण व जिम तसेच विद्यालयात मुला-मुलींसाठी आधुनिक व उत्तम शिक्षणाची तसेच निवासाची सुविधा नवोदय विद्यालयात 75 टक्के जागा ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी व 25 टक्के जागा शहरी विभागातील सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाचा मुख्य उद्देश आधुनिक शिक्षणाबरोबर राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी म्हणून विद्यालयात त्रिभाषा सूत्राचे अनुपालन करण्यात आले आहे. यासाठी दरवर्षी इयत्ता 9 वी मध्ये 30 टक्के विद्यार्थी अहिन्दी भाषी प्रदेशातून हिन्दी भाषी प्रदेशात व हिन्दी भाषा प्रदेशातून अहिन्दी भाषी प्रदेशात शिक्षणासाठी एका वर्षाकरीता स्थलांतरित होतात. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व विविध कलागुणांची अदलाबदली होते व राष्ट्रीय एकात्मता हा उद्देशही वाढीस लागतो.

नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आज देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत व आपली सेवा विविध शासकीय उच्च पदावर देत आहेत. यु.पी.एस.सी, एम.पी.एस.सी, एन.ई.ई.टी, जे.ई.ई (UPSC, MPSC, NEET व JEE) सारख्या उच्च परीक्षा पास करून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. देशातील विविध जिल्ह्यात व तालुका स्तरावर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार या सन्माननीय पदावर असून देशाची सेवा करीत आहेत व आपला स्वतःचा, परिवाराचा व नवोदय विद्यालयाचा गौरव वाढवित आहेत. आय.आय.टी सारख्या तंत्रशिक्षण संस्थांमधून सर्वात जास्त नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी पास होऊन विद्यालयाची पताका फडकवित आहेत.

तरी रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय शाळातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य किरण इंगळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड