राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग शोध मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे --जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर

 


अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका):- जिल्ह्यात क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जोखीमग्रस्त भागात तसेच शहरी व ग्रामीण भागात हाती घेतलेली आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी आज जिल्हा क्षयरोग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

        ते म्हणाले, दि. 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आरोग्य विभागाचे पथक (आशा स्वयंसेवक, आरोग्य सेवक/सेविका/ आरोग्य सहाय्यक/समुदाय वैद्यकीय अधिकारी) घरोघरी जाऊन संशयित क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत. त्यांना तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात आणून औषधोपचार केले जाणार आहेत.

            जिल्ह्यात जानेवारी 2021 पासून दि. 31 ऑक्टोबर 2021 अखेर क्षयरोगाचे 2 हजार 794 क्षयरुग्ण शोधण्यात आले आहेत. (शासकीय व खाजगी संस्थेमध्ये) असे असले तरी आजही समाजात आणखी क्षयरुग्ण असण्याची शक्यता आहे.  या रुग्णांना शोधून त्यांना क्षयरोगमुक्त करण्यासाठीच सक्रिय क्षयरोग शोध मोहीम दि. 15 ते 25 नोव्हेंबर 2021 दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन लक्षणे असणाऱ्या संशयित क्षयरुग्णांना माहिती घेऊन जवळच्या आरोग्य संस्थेत नेऊन तपासणी करणार आहेत. त्याची थुंकी नमुने तपासणीसह एक्स-रे मोफत काढले जाणार आहेत.  ज्यांचा तपासणी निष्कर्ष अहवाल क्षयरोगासाठी पॉझिटिव्ह येईल त्याच्यावर 6 ते 28 महिन्यापर्यंत (क्षयरुग्णाच्या प्रकारावरून) औषधोपचार करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक रुग्णास प्रति महिन्याला 500 रुपये निक्षय पोषण योजनेसाठी भत्ताही दिला जाणार असल्याचे डॉ.देवकर यांनी सांगितले. 

            कोणत्याही व्यक्तीस 2 आठवड्यांपासून अधिक कालावधीचा खोकला किंवा ताप येत असेल, त्यास भूक मंदावणे, रात्रीचा येणारा ताप व घाम, वजनात लक्षणीय घट थकवा येणे, सतत छातीत दुखणे किंवा थुंकीवाटे रक्त पडणे, मानेवर कातडीखाली गाठी असणे यापैकी एक किंवा जास्त लक्षणे असल्यास त्वरीत क्षयरोगाच्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. विशेष करून वरील लक्षणे ज्या रुग्णास पूर्वीपासूनच मधुमेह, एचआयव्ही बाधित, मूत्रपिंडाचे आजार, रक्तदाब, हृदयरोग, वयस्कर व्यक्ती, कुपोषित बालके, स्टिरॉइड औषधे घेणाऱ्या व्यक्ती, छातीचे इतर विकार, कॅन्सर, धुम्रपान व कुठल्याही प्रकारची तंबाखू सेवन करणाऱ्या, मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास कालावधीचा विचार न करता प्रथम प्राधान्याने क्षयरोग शोधण्यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. कारण इतर आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये क्षयरोगामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

              या विशेष क्षयरोग शोध मोहीम कालावधीत जिल्ह्याचे नियोजन पुढीलप्रमाणे असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवकर यांनी दिली आहे :- जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 29 लाख 83 हजार 785 (पनवेल महानगरपालिकेसह), विशेष क्षयरोग शोध मोहिमेसाठी निश्चित केलेली लोकसंख्या 4 लाख 29 हजार 447,  सर्वेक्षण करावयाची एकूण घरे संख्या 85 हजार 889,  सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या पथकांची संख्या 216, या सर्वेक्षणावर पर्यवेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक संख्या 43, गावपातळीवरील शेवटच्या आशापर्यंत या मोहिमेसाठी आवश्यक फॉर्म्स, बेडका नमुना तपासणी पात्र, संदर्भ सेवा पत्रे इ. पोहोच करण्यात आलेली आहेत. या मोहिमेसाठी तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी हे पर्यवेक्षण व सनियंत्रण करतील. वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय हे संशयित क्षयरुग्णांच्या बेडका तपासणी व क्ष-किरण तपासणी याबाबत पर्यवेक्षण व सनियंत्रण करतील, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व मनपा आरोग्य अधिकारी यांना राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, टिग्री हेल्य व्हिजीटर्स हे मदत करतील.

                जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे व आपल्या घरातील किंवा शेजारील व्यक्तीस वरील लक्षणे आढळल्यास शासकीय दवाखान्यात क्षयरोगाची तपासणी करण्यासाठी समुपदेशन करावे. समाजातील सर्व घटकांनी एकत्रपणे सहकार्याने काम केल्यास क्षयरोगाचे दुरीकरण 2025 या वर्षापर्यंत नक्की होईल.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जे रुग्ण खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे निदान होऊन उपचार घेतात त्यांनाही या कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात व आर्थिक लाभाच्या योजनाही दिल्या जातात. यासाठी संबंधित डॉक्टरांनी त्यांच्याकडील निदान झालेल्या व उपचारावर ठेवण्यात आलेल्या क्षयरुग्णांची माहिती स्थानिक शासकीय आरोग्य संस्थेकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व खाजगी डॉक्टरांना कळविण्यात आले आहे.

             यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ, सतिश दंतराव, समन्वयक श्री.दत्तात्रय शिंदे, औषध निर्माण अधिकारी श्री. मनोज बामणे,श्रीमती वृषाली पाटील आदींची उपस्थिती होती.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक