खेलो इंडिया यूथ गेम्स जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात खेळामध्ये प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास यश नक्की मिळते -आंतरराष्ट्रीय धावपटू तथा उरण प्रांताधिकारी ललिता बाबर

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल येथे करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील 18 वर्षाखालील मुलांच्या एकूण 16 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा प्रांताधिकारी उरण श्रीमती ललिता बाबर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी श्रीमती ललिता बाबर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी आपल्या खेळांमध्ये प्रामाणिक कष्ट घ्यावे तसेच खेळांमधील जय-पराजय हे खिलाडू वृत्तीने स्वीकारावेत. पराजित झालेल्या खेळाडूंनी निराश न होता पुन्हा नव्या जोमाने पुढील स्पर्धेची तरी करून अधिकाधिक यश संपादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, त्यांनी उपस्थित खेळाडूंना सांगितले. त्याचबरोबर उपस्थित तसेच जिल्‍ह्यातील सर्व खेळाडू युवक- युवती ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदार नाव नोंदणी मोहिमेत सहभाग घेऊन मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवून भारतीय लोकशाही अधिक भक्कम करावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच या निवड समिती सदस्य श्री. सूर्यकांत ठाकूर,श्री.संजय कडू, कर्नाळा स्पोर्टस ॲकॅडमीचे अध्यक्ष श्री.मुकुंद म्हात्रे, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे श्री. जनार्दन पाटील, प्रो-कबड्डी स्पर्धेचे पंच श्री. सुहास पाटील, कबड्डी असोसिएशनचे पंच, तांत्रिक अधिकारी, क्रीडा शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे क्रीडा अधिकारी  श्री. सचिन निकम, क्रीडा मार्गदर्शक श्रीम. मनिषा मानकर तसेच श्री. समीर रेवाळे यांनी स्वागत केले. यावेळी श्री.रविंद्र नाईक यांनी उपस्थित मान्यवरांना क्रीडा कार्यालयाच्या वतीने क्रीडा विभाग व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो असलेल्या मास्कचे वाटप केले. प्रदर्शनीय सामन्यादरम्यान श्रीमती ललिता बाबर तसेच इतर मान्यवरांनी खेळाडूंचा परिचय करून घेतला व त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथील अधिकारी कर्मचारी तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. गुरुवार, दि.25 रोजी 18 वर्षाखालील मुलींच्या गटातील सामने होणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक