कोविड-19 विषाणूच्या “ओमायक्रॉन” व्हेरिएंटचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी शासनाने नव्याने केले निर्देश जारी

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका):- कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्देश नव्याने जारी केले आहेत.

भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वेळोवेळी लागू करण्यात येणारे निर्बंध हे किमान निर्बंध म्हणून
आंतरराष्ट्रीय व अंतरराज्य विमान प्रवाशांवर लागू राहतील.
  तसेच दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिम्बाब्वे या देशांना अतिजोखीम राष्ट्र (High Risk Countries) म्हणून घोषीत करण्यात आले आहे. अनुसूचित करण्यात आलेले अतिजोखीम राष्ट्रे ही कोविड-19 च्या ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादूर्भावानुसार घोषित करण्यात आलेले असून त्यात महाराष्ट्र शासन गरजेनुसार सुधारणा करेल. तर अतिजोखीम राष्ट्रातून महाराष्ट्रात येणारे प्रवासी, महाराष्ट्रात येण्यापूर्वी मागील 15 दिवसात अतिजोखीम राष्ट्रात प्रवास करून आलेले विमान प्रवासी अतिजोखीम प्रवासी (High Risk Air Passengers) म्हणून समजण्यात येतील.

केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त अतिजोखीम विमान प्रवाशांकरीता पुढील निर्बंध लागू राहतील:-

अतिजोखीम विमान प्रवाशांकरिता सबंधित विमानतळ व्यवस्थापन अधिकारी यांनी वेगळ्या काऊंटरची आणि अशा प्रवाशांच्या तपासणीची वेगळी व्यवस्था करावी. तसेच अंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अशा प्रवाशांना तात्काळ आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक राहील व 7 दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. त्यांची दुसरी आरटीपीसीआर चाचणी 7 व्या दिवशी करावी लागेल. कोणत्याही आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास संबंधित अतिजोखीम विमान प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात यावे व कोविड उपचार सुविधा पुरविण्यात याव्यात. जर दुसऱ्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा अतिजोखीम विमान प्रवाशाला आणखी 7 दिवस गृह विलगीकरण बंधनकारक राहील.

पोलीस उपायुक्त, परदेश प्रवास (Immigration) आणि परदेशी विभागीय नोंदणी कार्यालय (FRRO) यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून घ्यावयाच्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करावा. ज्यामध्ये मागील 15 दिवसात त्यांनी कोणकोणत्या देशात प्रवास केला त्याचा तपशिल नमूद करावा. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी तो मसुदा हा सर्व विमान कंपन्यांना पुरवावा आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशाची मागील 15 दिवसातील प्रवासाच्या माहितीची तपासणी करावी. तसेच चुकीची माहिती दिली असल्याचे निष्पण्ण झाल्यास संबंधीत प्रवासी आपत्कालीन व्यवस्थापन, अधिनियम 2005 नुसार कारवाईस पात्र ठरेल.

आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशाबाबतीत, असे प्रवासी पूर्णपणे लसीकरण केलेले असावेत किंवा त्यांच्याकडे मागील 72 तासात आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र विमानात बसण्यापूर्वी असणे बंधनकारक आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पुढील आदेश होईपर्यंत लागू केले आहेत.

या आदेशातील नमूद बाबींचे उल्लघंन करणारी व्यक्ती / आस्थापना दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक