मुरुड-जंजिराचे प्रसाद चौलकर आणि पनवेलचे अभिजित सिंग कोहली यांनी पूर्ण केली स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” 23 दिवसात पूर्ण केली 12 राज्य आणि 7 हजार किलोमीटरची 'बाईक राइड'

 


अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-    भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून (INDUSEM) इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना  (WHO),  ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS, Delhi) यांच्यातर्फे 'स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा' आयोजित केली गेली.  या माध्यमातून 12 राज्ये आणि तब्बल 7 हजार किलोमीटरच्या या मोटारसायकल परिक्रमेसाठी रायगड जिल्ह्यातील श्री.प्रसाद प्र. चौलकर (मुरुड जंजिरा) आणि अभिजित सिंग कोहली (पनवेल) या दोन अनुभवी बाईकर्सची विशेष निवड करण्यात आली होती.

दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल, रायगड येथून सुरू झालेली स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात या 12 राज्यात प्रवास करून दि.30 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे समाप्त झाली. या परिक्रमेत 'इजा प्रतिबंध' (Injury Prevention) आणि 'रस्ता सुरक्षा' (Road Safety)  हे महत्त्वाचे संदेश देण्यात आले तसेच 'अतुल्य भारत' (Incredible India) चा प्रचार आणि प्रसार करत श्री.प्रसाद आणि अभिजित यांनी ही परिक्रमा 23 दिवसांत यशस्वीपणे पार पडली.

या परिक्रमेदरम्यान नवीन भारतीय चलनी नोटांवर छापलेल्या ऐतिहासिक स्मारकांना भेट देऊन भारताच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली स्थळांच्या जतन आणि संवर्धनाबाबत जागरूकतेचा प्रयत्न केला गेला.  इंडिया टुरिझम, पर्यटन मंत्रालय-भारत सरकार यांनी या परिक्रमेचे दिल्ली  येथील  प्रादेशिक कार्यालयात स्वागत केले. पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हणत भारत पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. इंडिया टुरिझम-जयपूर तसेच राजस्थान सरकार पर्यटन विभागाच्या राजस्थान येथील कार्यालयात श्री.प्रसाद आणि अभिजित यांचा यथोचित स्वागत आणि  सन्मान करण्यात आला.

INDUSEM चे संस्थापक डॉ. सागर गालवणकर (अमेरिका) यांच्या विशेष सहकार्याने ही परिक्रमा पार पडली. दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी भारतातील सर्वात मोठी आरोग्य संस्था 'एम्स' दिल्ली येथे या दोन बाईकस्वारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी एम्स तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे उच्च पदाधिकारी उपस्थित होते. तसेच देश विदेशातील आरोग्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी एम्स मध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांसोबत संवाद साधण्याची संधी श्री.प्रसाद आणि अभिजित यांना मिळाली.

श्री.प्रसाद चौलकर हे आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू असून त्यांनी या आधी भारतातील 22 राज्ये आणि एकूण 3 देशात बाईक राइड केलेली आहे. भ्रमंती करताना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून विविध सामाजिक संदेश देत रस्ता सुरक्षा संबधी जनजागृती करण्याचे बहुमोल कार्य ते करीत असतात.  त्यांच्या कार्याबद्दल, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक आयुक्त कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्थांद्वारे त्यांना सन्मानित केले गेले आहे.

त्याचप्रमाणे श्री.अभिजित सिंग कोहली हे एक अनुभवी बाईक रायडर असून कोविड-19 च्या संकटापासून मुक्त करण्यासाठी नांदेड, पाटणा, अमृतसर,आनंदपूर, भटिंडा (पंजाब) अशा 5 ठिकाणी तख्त यात्रेच्या  माध्यमातून 5 हजार 436 कि.मी. अंतर बाईकवर पूर्ण केले. या बाईक राइडची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड द्वारे घेतली गेली. श्री.प्रसाद आणि अभिजित यांनी यापूर्वी गुजरात सरकारच्या गुजरात टुरिझमसाठी रण ऑफ कच्छ' बाईक राइड करून तेथील पर्यटनालाही चालना मिळण्यास आपले योगदान दिले आहे.

येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथील युवक-युवतींना  एकत्र घेवून रायगड जिल्ह्यासाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचेही श्री.प्रसाद चौलकर व श्री.अभिजित सिंग कोहली यांनी सांगितले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक