ग्रामपंचायत व नगरपंचायत मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीबाबतचे बंदी आदेश जारी

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील एकूण 179 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तसेच 06 नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक 2021 कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील एकूण 179 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका व एकूण 06 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असून मतमोजणी बुधवार, दि.22 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.

रायगड जिल्हयातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-2021 च्या अनुषंगाने मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर मतमोजणी बुधवार, दि. 22 डिसेंबर 2021 या दिवशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने जिल्हयातील एकूण 179 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका व एकूण 06 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता जाहीर केलेल्या त्या क्षेत्रातील सर्व मद्य विक्री करणाऱ्या अबकारी अनुज्ञप्त्या व इतर संबंधित अबकारी अनुज्ञप्त्या (परवाने) महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत.

सोमवार, दि.20 डिसेंबर 2021 रोजी- अनुज्ञप्ती (परवाने) बंद ठेवण्याचा दिवस- मतदानाच्या अगोदरचा दिवस, अनुज्ञप्ती(परवाने)  बंद ठेवण्याची वेळ- संपूर्ण दिवस, मद्यविक्री अनुज्ञप्ती (परवाने) बंदचे क्षेत्र- मतदान क्षेत्रातील सर्व मद्य विक्री करणाऱ्या अबकारी अनुज्ञप्त्या (परवाने).

मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी- अनुज्ञप्ती (परवाने) बंद ठेवण्याचा दिवस- मतदानाचा दिवस, अनुज्ञप्ती (परवाने)  बंद ठेवण्याची वेळ- 21 डिसेंबर 2021 रोजी, सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत, मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती (परवाने)  बंदचे क्षेत्र- मतदान क्षेत्रातील सर्व मद्य विक्री करणाऱ्या अबकारी अनुज्ञप्त्या (परवाने).

बुधवार, दि.22 डिसेंबर 2021 रोजी- अनुज्ञप्ती (परवाने) बंद ठेवण्याचा दिवस- मतमोजणीचा दिवस, अनुज्ञप्ती(परवाने)  बंद ठेवण्याची वेळ- मतमोजणी संपेपर्यत, मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती(परवाने)  बंदचे क्षेत्र- मतमोजणीच्या क्षेत्रातील (संपूर्ण ग्रामपंचायत/नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील) सर्व मद्य विक्री करणाऱ्या अबकारी अनुज्ञप्त्या (परवाने).

तसेच या निवडणूक क्षेत्रातील सर्व देशी/विदेशी/बिअर/ वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक (परवानेधारक)  बंदच्या कालावधीत उत्पादन करू शकतील. परंतु या कालावधीत कोरडा दिवस (ड्राय डे) लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही, असेही आदेशित करण्यात आले आहे.

वरील नमूद केलेल्या दिवशी सर्व अनुज्ञप्ती(परवाने) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक